राष्ट्रीय लोकअदालतीत ठाणे जिल्हा पुन्हा अव्वल; २९ हजारांहून अधिक प्रकरणांचा निपटारा

न्यायालयात प्रलंबित असलेल्या हजारो प्रकरणांचा जलदगतीने निपटारा करत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने राष्ट्रीय लोक अदालतीत सलग पाचव्यांदा राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
राष्ट्रीय लोकअदालतीत ठाणे जिल्हा पुन्हा अव्वल; २९ हजारांहून अधिक प्रकरणांचा निपटारा
राष्ट्रीय लोकअदालतीत ठाणे जिल्हा पुन्हा अव्वल; २९ हजारांहून अधिक प्रकरणांचा निपटारा
Published on

ठाणे : न्यायालयात प्रलंबित असलेल्या हजारो प्रकरणांचा जलदगतीने निपटारा करत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने राष्ट्रीय लोक अदालतीत सलग पाचव्यांदा राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. ९ मे रोजी झालेल्या वर्षातील दुसऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीत तब्बल २९ हजार ३९२ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून त्यामध्ये ६३ कोटी ४२ लाख ५२ हजार ६४८ रुपयांची तडजोड करण्यात आली.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष श्रीनिवास अगरवाल यांच्या मार्गदर्शनाखाली ही लोकअदालत पार पडली. लोकअदालतीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव रवींद्र पाजणकर यांनी दिली.

सामंजस्याने प्रकरणे निकाली

प्रलंबित १२ हजार १८६ आणि दावा दाखलपूर्व १७ हजार २०६ अशी एकूण २९ हजार ३९२ प्रकरणे सामंजस्याने निकाली काढली. विशेष म्हणजे ५, १०, २० आणि ३० वर्षांपासून प्रलंबित ५६७ प्रकरणेही मिटवण्यात आली.

ट्रॅफिक, चेक बाऊन्सचाही निपटारा

लोकअदालतीत मोटार वाहन कायद्यांतर्गत ट्रॅफिक चलनाची ६ हजार ९८३ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यात ७२ लाख २१ हजार १०० रुपयांची तडजोड झाली तसेच धनादेश अनादर अर्थात चेक बाऊन्सच्या १ हजार १४६ प्रकरणांमध्ये १९ कोटी ५८ लाख ७९ हजार ५९९ रुपयांची तडजोड करण्यात आली. किरकोळ प्रकरणांमध्ये ८ हजार ७८९ आरोपींनी गुन्हा कबूल करत ८१ लाख १९ हजार ५० रुपयांचा दंड भरला.

राष्ट्रीय लोकअदालतीत ठाणे जिल्हा पुन्हा अव्वल; २९ हजारांहून अधिक प्रकरणांचा निपटारा
मराठी पाट्या लावण्याचा नियम सर्रास धाब्यावर; ३ हजारांहून अधिक आस्थापनांना न्यायालयाचा दणका; १ कोटी ९१ लाखांचा दंड वसूल

वैवाहिक वादांमध्येही समेट

कौटुंबिक न्यायालयातील वैवाहिक वाद मिटवण्यासाठी प्रयत्न झाले. त्यामध्ये ३० प्रकरणांमध्ये यशस्वी समेट झाला असून त्यापैकी सात पती-पत्नी पुन्हा एकत्र राहण्यास तयार झाले. प्रॉपर्टी टॅक्स, महसूल संबंधित दावा दाखलपूर्व ३८३ प्रकरणांमध्ये २ कोटी १७ लाख ३२ हजार ८१४ रुपयांची तडजोड झाली.

राष्ट्रीय लोकअदालतीत ठाणे जिल्हा पुन्हा अव्वल; २९ हजारांहून अधिक प्रकरणांचा निपटारा
लोकशाहीचे चारही खांब झालेत खिळखिळे!

१५ कोटींची तडजोड

मोटार अपघात नुकसानभरपाईच्या १२० प्रकरणांमध्ये एकूण १५ कोटी ६४ लाख ४३ हजार २७६ रुपयांची तडजोड करण्यात आली. ठाणे मुख्यालयातील ८८ प्रकरणांमध्ये ११ कोटी ६८ लाख रुपयांहून अधिक नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली. यातील एका प्रकरणात मोटार अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या वारसांना इन्शुरन्स कंपनीकडून ८७ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली. विशेष म्हणजे अपघाताच्या घटनेनंतर अवघ्या एका वर्षात संबंधित कुटुंबाला नुकसानभरपाई मिळाली. तसेच दुसऱ्या एका प्रकरणात ६० लाख रुपयांची तडजोड करण्यात आली.

logo
marathi.freepressjournal.in