डोंबिवली येथील पलावा परिसरात झोमॅटो आणि स्विगी डिलिव्हरी बॉयजनी सोमवारी (दि. १५) अचानक कामबंद आंदोलन छेडले आहे. कंपनीकडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळत नसल्याने अखेर डिलिव्हरी बॉयज आक्रमक झाले. या आंदोलनाला मनसेने पाठिंबा दिला आहे.
झोमॅटो आणि स्विगी कंपनीने पेमेंट स्ट्रक्चरमध्ये केलेल्या बदलांमुळे रोजंदारीत मोठी घट झाली आहे. डिलिव्हरी चार्जेस आणि बोनस कमी झाले असून, पेट्रोल खर्च वाढला तरी मानधन पुरेसे मिळत नसल्याचा त्यांचा आरोप आहे.
कंपनीकडून सहकार्य मिळत नाही
आंदोलनकर्त्यांनी प्रतिक्रिया दिली, की ''बऱ्याच दिवसांपासून आंदोलन करण्याचा विचार होता. मात्र, कंपनी काहीतरी उपाय करेल अशी अपेक्षा होती. आम्ही मॅनेजरला, टीम लीडरला सर्व तक्रारी सांगतो. स्क्रीनशॉर्ट पाठवतो. रायडरला अशाप्रकारचा त्रास होत आहे. पण, आमच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जाते. आधी पैसे चांगले मिळत होते. मात्र, आता पैसेही कमी दिले जातात. त्यात कोणताही फायदा होत नाही. शिवाय आम्हाला कंपनीकडून कोणत्याही प्रकारची मदत केली जात नाही. तक्रार केली तर कामावरून काढून टाकले जाते. अपघातात मृत्यू झाल्यास १० लाख रुपये मिळतात. मात्र, हे पैसे दिले जात नाही. मध्ये एका मुलाचा डिलिव्हरीवेळी अपघातात मृत्यू झाला. पोलिसांनीही सांगितले, की परिवाराला पैसे मिळतील. मात्र, ते अद्याप पोहचलेले नाही. आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोवर कोणीही डिलिव्हरी करण्यास जाणार नाही. बाहेरून येणाऱ्या रायडरलाही आम्ही डिलिव्हरी करू देणार नाही.''
मनसेचा इशारा
या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जाहीर पाठिंबा दिला आहे. मनसे नेते राजू पाटील यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्ते आंदोलनस्थळी दाखल झाले. मनसेने इशारा दिला की, "जर कोणत्याही डिलिव्हरी बॉयला कामावरून काढले, गुन्हे दाखल केले किंवा धमक्या दिल्या, तर कल्याण, डोंबिवली, पलावा, दिवा परिसरातील हॉटेलमधून एकही ऑर्डर बाहेर जाऊ देणार नाही."