
गणेशोत्सवाला अवघे काही तास बाकी असताना डोंबिवलीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गणेशमूर्ती बनवणारा एक मूर्तिकार अचानक गायब झाल्याने शेकडो भाविकांची मोठी गैरसोय झाली आहे. गणेश भक्तांनी मूर्तीची ऑर्डर देऊन एडवान्स पैसेही दिले होते. मात्र, ऐन चतुर्थीच्या आदल्या दिवशी मूर्ती न मिळाल्याने भविकांचा मोठा गोंधळ उडाला आहे.
जास्त ऑर्डर्सचा ताण पडला भारी
फुले रोडवरील ‘आनंदी कला केंद्रात’ दरवर्षीप्रमाणे यंदाही गणपती मूर्तींसाठी मोठ्या प्रमाणावर बुकिंग करण्यात आले होते. मात्र, यावेळी अपेक्षेपेक्षा जास्त ऑर्डर्स आल्याने मूर्तिकारावर प्रचंड ताण आला. एकट्याने एवढा मोठा भार उचलणे शक्य नसल्याने त्याने कार्यशाळा सोडून पलायन केल्याचे समजते.
गणेशोत्सव काही महिन्यांपूर्वीच मूर्तींची नोंदणी करून ठेवली जाते, जेणेकरून शेवटच्या क्षणी गर्दीतून बचाव होईल आणि हवी तशी मूर्ती वेळेत मिळेल. मात्र, डोंबिवलीतील या प्रकरणात प्रमाणापेक्षा जास्त बुकिंग स्वीकारल्याने शेवटी मूर्तिकार पळून गेला.
या घटनेमुळे बुकिंग केलेल्या भक्तांचे पैसे अडकले असून, अनेकांना हाताला मिळेल तिथून मूर्ती घ्यावी लागली. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. संतप्त भाविकांनी पोलिसांकडे धाव घेतली असून, या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे.