

डोंबिवली : डोंबिवली शहरात वाढत्या लोकसंख्येने शहरातील वाहनांची संख्या वाढली. वाहने वाढली पण वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न अजूनही सुटका नाही. परिणामी रस्त्याच्या दुर्तफा पार्किंग होऊन वाहतूककोंडी वाढली. अशा वाहनांवर कारवाई करण्यासाठी टोईंग व्हॅनची गरज लागते. मात्र परिवहन विभागाला याची गरज वाटतं नसल्याने डोंबिवलीला टोईंग व्हॅन दिली नाही.
वाहतूक पोलीस यावर हात वर करत वरिष्ठांना त्यासंदर्भात पत्र दिले आहे, असे सांगतात. यावर माजी नगरसेवक शैलेश धात्रक यांनी वाहतूक पोलिसांना जागे करण्याचा प्रयत्न केला आहे. शहरात लवकरात लवकर टोईंग व्हॅन धावली नाही तर आंदोलन करू, असा इशारा धात्रक यांनी दिला आहे.
धात्रक म्हणाले, शहर वाहतूक विभागाच्या वतीने चुकीच्या पद्धतीने पार्क केलेल्या दुचाकी वाहनांवर टोईंग व्हॅनद्वारे कारवाई करण्यात येत होती. त्यामुळे वाहनचालकांमध्ये आदरयुक्त शिस्त निर्माण झाली होती आणि वाहतूक सुरळीत राहण्यास मोठी मदत होत होती.
तसेच तीनचाकी व चारचाकी वाहनांवरही नियमानुसार दंडात्मक कारवाई केली जात होती. मात्र, डिसेंबर २०२५ पासून आज दिनांक ०३ जुलै २०२६ पर्यंत डोंबिवली पूर्व व पश्चिम विभागात चुकीच्या ठिकाणी पार्क केलेल्या दुचाकी वाहनांवर टोईंग व्हॅनद्वारे कारवाई बंद पडली आहे.