
उल्हासनगर : उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर ५ येथील शासकीय निरीक्षण गृहातून बुधवारी मध्यरात्री तब्बल आठ अल्पवयीन मुलींनी खिडकीच्या लोखंडी जाळ्या तोडून पलायन केल्याने खळबळ उडाली. या घटनांनी प्रशासनाच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. विशेष म्हणजे, पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हिललाईन पोलिसांनी तत्काळ शोधमोहीम राबवून सात मुलींना उल्हासनगर रेल्वे स्थानकातून ताब्यात घेतले. मात्र एक १७ वर्षीय मुलगी अद्याप फरार असून तिच्या शोधासाठी पोलिसांची धडपड सुरू आहे.
बुधवारी मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास आठ अल्पवयीन मुलींनी लोखंडी जाळ्या तोडून पलायन केले. १५ ते १७ वयोगटातील या मुली निरीक्षण गृहाच्या शय्यागृहातून बाहेर पडल्या. कर्मचाऱ्यांना रात्री टेहाळणी करताना मुलींची अनुपस्थिती आणि जाळ्यांची तुटलेली अवस्था पाहून शासकीय निरीक्षण गृहाच्या वरिष्ठांना आणि पोलिसांना याची माहिती दिली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस उपायुक्त सचिन गोरे आणि हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तत्काळ शोधमोहीम राबवली.