ठाणे : राम गणेश गडकरी रंगायतन हे ठाण्याची शान असून ते कलावंतांचे अविभाज्य अंग आहे. ही केवळ एक इमारत नसून ठाण्याचे हृदय आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी नूतनीकरण झालेल्या गडकरी रंगायतनच्या लोकार्पणावेळी केले. ‘अजून काही उणिवा असल्यास सांगा, निधी कमी पडू देणार नाही,’ अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत गडकरी रंगायतनच्या नव्या रूपातील तिसरी घंटा शिंदे यांच्या हस्ते वाजवण्यात आली. नूतनीकरणानंतर रंगमंच पुन्हा खुला झाल्याने ठाणेकर रसिकांच्या वर्षभराच्या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळाला. दुरुस्तीच्या काळात कलावंत आणि कलाप्रेमी यांच्या सूचनांना महत्त्व दिल्याने काहीसा वेळ लागला, परंतु त्यातूनच गडकरी आज अधिक सुबक, दिमाखदार आणि सज्ज असल्याचे शिंदे म्हणाले. स्वच्छता आणि देखभाल ही वास्तूची खरी ओळख असल्याचे सांगत त्यांनी रंगकर्मी व प्रेक्षकांसाठी असलेली स्वच्छतागृहे स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले.
लोकार्पण सोहळ्यात मुकुंद मराठे यांनी ‘नांदी’ सादर करून ४७ वर्षांपूर्वी राम मराठे यांनी सुरू केलेली परंपरा जिवंत केली. त्यानंतर पंडित विवेक सोनार यांच्या फ्ल्यूट रेसिटलने वातावरण भारावून गेले. यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, महापालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, सीईओ रोहन घुगे, ज्येष्ठ कलावंत सुहास जोशी, दिग्दर्शक अशोक हांडे यांसह मान्यवर उपस्थित होते.
माझे करियर ठाण्यातून सुरू - अशोक हांडे
माझे करिअर १९७७ मध्ये याच गडकरीत सुरू झाल्याची आठवण अशोक हांडे यांनी सांगितली. ‘मंगल गाणी दंगल गाणी’च्या प्रयोगावेळी ठाण्यात दंगल असतानाही एकनाथ शिंदे कार्यक्रम संपेपर्यंत खाली उभे होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एक खरा कार्यकर्ता आणि रसिक आहेत. शिंदे यांचे व्हिजन गडकरीमध्ये दिसत आहे, तर ठाणेकर रसिक हा जगात नंबर वन आहे.
ठाण्याला ‘हापूस पार्क’
काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश अभय ओक यांनी ‘पूर्वी ठाण्यात रस्त्याने जाताना हापूस आंबे मिळायचे; आता नाही मिळत’ अशी खंत व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी ठाण्यात हापूस पार्क उभारण्याची घोषणा केली.