
Indo Amines, Dombivli Fire: डोंबिवलीत आज, १२ जून रोजी पुन्हा एकदा अग्नितांडव सुरु झालंय. महिन्याभरापूर्वीच येथील एमआयडीसी फेज २ मधील अमुदान कंपनीत स्फोट झाल्याने भीषण आग लागून जवळपास ६ जणांना जीव गमवावा लागला होता. त्यानंतर आता त्याच कंपनीपासून अवघ्या ३०० मीटर अंतरावर आगीची दुसरी घटना घडली आहे. अभिनव विद्यालयाजवळील इंडो अमाईन्स या केमिकल कंपनीत स्फोटानंतर भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ७ ते ८ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रय़त्न सुरू आहेत.
सोशल मीडियावर या भीषण आगीचे काही फोटो-व्हिडिओ समोर आले असून काळ्याकुट्ट धुराचे लोट आकाशात दिसत आहेत. काही कामगार कंपनीमध्ये अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ज्या कंपनीत स्फोट झाला, तिच्या शेजारील कंपनीतही आगीचे लोट पसरल्याचे दिसून येत आहे. जवळच शाळा असल्याने परिसरातील विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली आहे. स्फोटामुळे कंपनीच्या बाहेर उभ्या असलेल्या वाहनांचेही नुकसान झाले आहे. तथापि, आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळी युद्धपातळीवर आग विझविण्याचे काम सुरु आहे.
हे ही वाचा
महिन्याभरातच पुन्हा एकदा डोंबिवलीमध्ये आग लागल्याने नागरिकांमध्ये भीतीच वातावरण आहे.
डोंबिवली अग्निशमन नियंत्रणानुसार, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कॉम्प्लेक्स फेज २ येथे, दाट लोकवस्ती असलेल्या निवासी परिसर आणि शाळेने वेढलेल्या इंडो अमाइन्स लिमिटेड या वेगवगेळ्या रसायनांचे उत्पादन करणाऱ्या कंपनीमध्ये सकाळी १० च्या सुमारास आग लागली. "आम्ही ताबडतोब किमान सात अग्निशमन दल रवाना केले आणि अग्निशमन कार्ये सुरू केली, तसेच वैद्यकीय पथके पाठवली. कारखान्यात कोणीही अडकले आहे की नाही याच्या तपशीलाची आम्ही वाट पाहत आहोत," अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.