

कल्याण पश्चिम येथील बिर्ला कॉलेज रोडवर रविवारी (दि. १) संध्याकाळी धावत्या कारला अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. काही काळासाठी रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली, तर नागरिक आणि वाहनचालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं.
कार जळून खाक
प्रत्यक्षदर्शींनुसार, धावत्या कारमधून अचानक धूर निघू लागला आणि काही वेळातच कारने पेट घेतला. प्रसंगाचं गांभीर्य ओळखत चालकाने वेळेत उडी घेत स्वतःचा जीव वाचवला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र कार पूर्णपणे जळून खाक झाली.
रस्त्यावर गोंधळ, वाहतूक ठप्प
वर्दळीच्या रस्त्यावर अचानक कारला आग लागल्याने काही काळ मोठा गोंधळ उडाला. आगीच्या ज्वाळा आणि धुरामुळे अनेक वाहनचालकांनी गाड्या थांबवल्या, तर स्फोट होण्याच्या भीतीने काही नागरिकांनी घटनास्थळापासून पळ काढला.
अग्निशमन दलाची तत्काळ धाव
घटनेची माहिती मिळताच कल्याण अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं. त्यांनी काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवलं. थोड्याचवेळात पोलिसही घटनास्थळी पोहोचले.
पाहा व्हिडिओ :
आगीचं नेमकं कारण काय?
प्राथमिक तपासात आगीचं कारण शॉर्ट सर्किट असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असला तरी सविस्तर तांत्रिक तपासणीनंतरच नेमकं कारण स्पष्ट होणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. जळालेलं वाहन हटवल्यानंतर बिर्ला कॉलेज रोडवरील वाहतूक हळूहळू पूर्ववत करण्यात आली.