Kalyan : शेजारणीला 'मम्मी' म्हटले म्हणून तीन वर्षांच्या चिमुरडीला अमानुष मारहाण; डोळ्यात मिरची पूडही टाकली, Video व्हायरल

कल्याणजवळील बापगाव येथे दत्तक घेतलेल्या तीन वर्षांच्या मुलीला शेजारणीला "मम्मी" म्हटल्याच्या कारणावरून पालनकर्त्या आईने मारहाण केल्याचा आणि डोळ्यांत मिरची पूड टाकल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Kalyan : शेजारणीला 'मम्मी' म्हटले म्हणून तीन वर्षांच्या चिमुरडीला अमानुष मारहाण; डोळ्यात मिरची पूडही टाकली, Video व्हायरल
Kalyan : शेजारणीला 'मम्मी' म्हटले म्हणून तीन वर्षांच्या चिमुरडीला अमानुष मारहाण; डोळ्यात मिरची पूडही टाकली, Video व्हायरल
Published on

कल्याण : कल्याणजवळील बापगाव परिसरात दत्तक घेतलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शेजारच्या महिलेेला "मम्मी" म्हणून हाक मारल्याच्या कारणावरून पालनकर्त्या आईने मुलीला मारहाण केली तसेच तिच्या डोळ्यांत तिखट टाकल्याचा गंभीर आरोप आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून पोलिसांनी प्रकरणाची दखल घेत कारवाई सुरू केली आहे.

दांपत्याकडे संगोपनाची जबाबदारी

मिळालेल्या माहितीनुसार, झंकार मोहल्ला परिसरात राहणाऱ्या दांपत्याने काही काळापूर्वी एका अल्पवयीन मुलीला सांभाळण्याची जबाबदारी घेतली होती. मुलीच्या आईचे निधन झाल्यानंतर तिच्या वडिलांच्या एका मित्राने तिच्या संगोपनाची जबाबदारी या दांपत्याकडे सोपवली होती.

शेजारणीला "मम्मी" म्हटल्याने संताप

स्थानिकांच्या मते, किरकोळ कारणांवरूनही या मुलीवर वारंवार अत्याचार केला जात असल्याची तक्रार होती. अलीकडील घटनेत मुलीने शेजारच्या एका महिलेला "मम्मी" म्हणून हाक मारल्याने पालनकर्त्या आईचा संताप अनावर झाला. त्यानंतर तिने मुलीला बेदम मारहाण केली. इतकेच नव्हे तर तिच्या डोळ्यांत मिरची पूड टाकल्याचा आणि मिरची पूड तोंडात घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही प्रत्यक्षदर्शींनी केला आहे.

पाहा व्हिडिओ

व्हिडिओ व्हायरल; गुन्हा दाखल

या अत्याचाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी कठोर कारवाईची मागणी केली. या प्रकरणी पडघा पोलिसांनी दिलशाद शेख या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. तसेच मुलीच्या जैविक वडिलांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू असून तपासाच्या निष्कर्षानुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in