कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांना भेडसावत असलेल्या तीव्र पाणीटंचाईला दिलासा मिळणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काळू धरण प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू असल्याचे शनिवारी (दि.६) आश्वासन दिले.
डोंबिवली येथील सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल पुनर्विकास कार्याचा व सावित्रीबाई फुले रंगमंदिर नूतनीकरण कार्याचा भूमिपूजन सोहळा राम क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी सांगितले. "हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कल्याण-डोंबिवलीला स्वतंत्र आणि मोठा पाणीपुरवठा स्रोत मिळेल आणि लाखो नागरिकांना त्याचा फायदा होईल."
५०० कोटी रुपयांचा निधी प्रकल्पासाठी मंजूर
एकनाथ शिंदे यांनी सांगितले, "त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून धरणाच्या कामाला गती देण्याची विनंती केली आहे." माध्यमांच्या अहवालानुसार, मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांनी एमएमआरडीए (MMRDA) मार्फत ५०० कोटी रुपयांचा निधी या प्रकल्पासाठी मंजूर करून घेतला होता.
सावित्रीबाई फुले नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे लोकार्पण
या कार्यक्रमादरम्यान, शिंदे यांनी डोंबिवलीतील विविध विकासकामांचे भूमिपूजनही केले. त्यांनी प्रेरणा वॉर मेमोरियलचे उद्घाटन केले तसेच संत सावळा राम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलाच्या पुनर्विकासाचे आणि सावित्रीबाई फुले नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे लोकार्पण केले. तसेच, "वैभवभारती संस्था संत सवळा राम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल उभारल्यामुळे जिल्ह्यातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांचा लाभ मिळेल," असेही त्यांनी सांगितले.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठिंब्यामुळेच...
या क्रीडा संकुलाच्या पहिल्या टप्प्यासाठी १८० कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून, सावित्रीबाई फुले नाट्यगृहाच्या पहिल्या टप्प्याच्या नूतनीकरणासाठी १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठिंब्यामुळेच ही सर्व कामे वेगाने सुरू असल्याचेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी नमूद केले. तसेच, कल्याण–डोंबिवली परिसराच्या जलद विकासासाठी सरकारने कोट्यवधी रुपयांचा निधी आधीच मंजूर केल्याची माहिती त्यांनी दिली.