

कल्याण रेल्वे स्थानकावर घडलेल्या एका घटनेने सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे. नातेवाईकांना रेल्वे स्टेशनवर सोडण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीट काढून स्थानकात गेलेल्या एका तरुणाला ट्रेन तब्बल पाच तास उशिरा आल्यामुळे जास्त वेळ थांबावे लागले. मात्र, ट्रेन उशिरा आल्याचा फटका उलट त्यालाच बसला आणि प्लॅटफॉर्म तिकीट एक्सपायर झाल्याचे सांगत तिकीट तपासनीसाने त्याच्याकडून ५०० रुपयांचा दंड वसूल केला.
ट्रेनची वाट पाहताना अडकला अन्...
मिळालेल्या माहितीनुसार, ११ जून रोजी संबंधित व्यक्ती आपल्या नातेवाईकांना रेल्वेत बसवण्यासाठी कल्याण स्थानकावर गेला होता. दुपारच्या सुमारास ट्रेन येणार असल्याने त्याने प्लॅटफॉर्म तिकीट काढून स्थानकात प्रवेश केला. मात्र, नियोजित वेळेत ट्रेन आलीच नाही. एक-दोन तास नव्हे तर तब्बल पाच तास उशिराने ट्रेन स्थानकावर दाखल झाली. त्यामुळे संबंधित व्यक्तीला नाईलाजाने स्थानकावरच थांबावे लागले.
सायंकाळी सुमारे ५ वाजता ट्रेन आल्यानंतर त्याने आपल्या नातेवाईकांना निरोप दिला आणि स्थानकाबाहेर जाण्यास निघाला. यावेळी तिकीट तपासनीसाने त्याचे प्लॅटफॉर्म तिकीट तपासले. तिकीटाची २ तासांची वैधता संपल्याचे सांगत अधिकाऱ्यांनी त्याच्यावर ५०० रुपयांचा दंड ठोठावला. ट्रेन उशिरा आल्यामुळेच आपण जास्त वेळ स्थानकावर थांबलो होतो, असे सांगूनही दंड माफ करण्यात आला नाही, असा दावा संबंधित तरुणाने केला आहे.
व्हिडिओ व्हायरल, रेल्वेवर प्रश्न
संबंधित व्यक्तीने आपल्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार व्हिडिओद्वारे सोशल मीडियावर मांडला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी रेल्वे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. "ट्रेन उशिरा येणे ही त्या व्यक्तीची चूक नव्हती, मग त्याच्याकडून दंड का वसूल करण्यात आला?" असा सवाल अनेकांनी उपस्थित केला आहे. काहींनी अशा परिस्थितीत प्रवाशांच्या नातेवाईकांना किंवा प्लॅटफॉर्म तिकीटधारकांना सवलत देण्यासाठी नियमांमध्ये बदल करण्याची मागणीही केली आहे.
रेल्वे नियम काय सांगतात?
रेल्वेच्या नियमांनुसार प्लॅटफॉर्म तिकीट हे २ तासांसाठीच वैध असते. ते ट्रेनच्या वेळेशी जोडलेले नसून तिकीट काढल्याच्या वेळेपासून त्याची वैधता मोजली जाते. त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांनी नियमांनुसारच कारवाई केल्याचे सांगितले जात आहे.
सोशल मीडियावर दोन मतं
या घटनेवर सोशल मीडियावर दोन वेगवेगळी मतं समोर आली आहेत. काही जण प्रवाशाच्या बाजूने उभे राहत रेल्वे प्रशासनावर टीका करत आहेत. तर काहींच्या मते, नियम हे नियम असतात आणि त्याचे पालन करणे आवश्यक आहे.मात्र एकूणच, रेल्वेच्या विलंबाचा फटका संबंधित व्यक्तीलाच बसल्याने ही घटना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.