कल्याणमध्ये महायुतीच्या प्रचार रॅलीत झेंडा हाय टेन्शन वायरला लागून स्फोट; थोडक्यात टळली मोठी दुर्घटना, घटनेचा Video व्हायरल

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी कल्याण शहरात एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. कल्याणच्या योगिधाम परिसरात महायुतीची प्रचार रॅली निघाली होती. या रॅलीमध्ये...
कल्याणमध्ये महायुतीच्या प्रचार रॅलीत झेंडा हाय टेन्शन वायरला लागून स्फोट; थोडक्यात टळली मोठी दुर्घटना, घटनेचा Video व्हायरल
Published on

राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराची सांगता मंगळवारी (दि.१३) झाली. तथापि, प्रचाराच्या शेवटच्या दिवशी कल्याण शहरात एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. कल्याणच्या योगिधाम परिसरात महायुतीची प्रचार रॅली निघाली होती. या रॅलीमध्ये पक्षाचा झेंडा अचानक उच्च-दाबाच्या विद्युत तारेला (High-Tension Wire) लागल्याने स्फोट झाला. स्फोटाच्या आवाजाने काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून विजेच्या लोंबकळणाऱ्या विद्युत वाहिन्यांवरून संताप व्यक्त होत आहे.

नेमकं काय झालं?

माहितीनुसार, महायुतीचे उमेदवार दया गायकवाड, वनिता पाटील ,गणेश कोट आणि अनघा देवळेकर यांच्या प्रचार रॅली दरम्यान ही घटना घडली. यावेळी एका कार्यकर्त्याच्या हातातील झेंडा टाटा कंपनीच्या लोंबकळणाऱ्या विजेच्या वायरला लागून स्फोट झाल्याचे समजते. या घटनेत क्षितिज पाटील नावाचा एक कार्यकर्ता जखमी झाला असून त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचंही सांगितलं जात आहे. तथापि, याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

झेंडा तारेला लागताच मोठा स्फोट

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'रेडिट'वर Lazy-Firefighter-749 या युजरने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, योगिधाम परिसरातील रस्ता दिसत असून महायुतीची प्रचार रॅली पुढे जात असल्याचे दिसते. एका पिक-अप वाहनावर महायुतीच्या पक्षांचे झेंडे लावण्यात आले होते. गाडीत उभ्या कार्यकर्त्यांच्या हातातही पक्षाचे झेंडे होते. एक झेंडा अचानक रस्त्याच्या वरून गेलेल्या उच्च-दाबाच्या वीजेच्या तारेला लागतो. झेंडा तारेला लागताच मोठा आवाज आणि स्फोट होतो. त्यानंतर एकच धावपळ उडते.

बघा व्हिडिओ

अधिकृत माहितीचा अभाव

या घटनेबाबत अद्याप पोलिस किंवा महापालिका प्रशासनाकडून कोणतेही अधिकृत निवेदन देण्यात आलेले नाही.

logo
marathi.freepressjournal.in