कल्याणमध्ये रॅपिडो चालकाचा धक्कादायक प्रकार; विनयभंगाच्या प्रकरणानंतर रॅपिडो, ओला आणि उबरवर टांगती तलवार

कल्याणमध्ये रॅपिडो बाईक टॅक्सी चालकाने तरुणीचा विनयभंग व लुटीचा प्रयत्न केल्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तातडीची बैठक बोलावली असून रॅपिडो, ओला, उबरच्या परवानग्यांवर निर्णय होण्याची शक्यता आहे.
कल्याणमध्ये रॅपिडो चालकाचा धक्कादायक प्रकार; विनयभंगाच्या प्रकरणानंतर रॅपिडो, ओला आणि उबरवर टांगती तलवार
कल्याणमध्ये रॅपिडो चालकाचा धक्कादायक प्रकार; विनयभंगाच्या प्रकरणानंतर रॅपिडो, ओला आणि उबरवर टांगती तलवार
Published on

कल्याणमध्ये रॅपिडो बाईक टॅक्सी चालकाने एका तरुणीचा विनयभंग केल्याची गंभीर घटना शनिवारी (दि. १३) घडली. या घटनेनंतर राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोटार परिवहन विभागाची तातडीची बैठक बोलावली आहे. ही बैठक बुधवारी, १७ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता होणार आहे.

तात्पुरत्या परवानग्या रद्द होणार?

या बैठकीत रॅपिडो, ओला आणि उबर यांसारख्या अ‍ॅप-आधारित बाईक टॅक्सी कंपन्यांना देण्यात आलेल्या तात्पुरत्या परवानग्या का रद्द करू नयेत, यावर सविस्तर चर्चा होणार आहे. या कंपन्या शासनाची अधिकृत परवानगी नसतानाही बेकायदेशीररीत्या कार्यरत असल्याचा आरोप केला जात आहे.

नेमकं घडलं काय?

१९ वर्षीय रॅपिडो चालकाने २६ वर्षीय तरुणीची कल्याण येथील चिकन घर परिसरातून राईड स्वीकारली. मात्र, ठरलेल्या ठिकाणी न सोडता त्याने स्कूटर एका निर्जन व अंधाऱ्या रस्त्यावर वळवली. तेथे त्याने तरुणीचा हात पकडून तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्या चालकाने तिची पर्स हिसकावून घेत त्यातील १ हजार रुपये काढून घेतले.

तरुणीने मदतीसाठी आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले. पीडितेने असा आरोपही केला आहे की,आरोपीकडे चाकू आणि अ‍ॅसिड स्प्रे होता. नागरिकांनी आरोपीला पकडून महात्मा फुले पोलिसांच्या ताब्यात दिले.

रॅपिडो आणि ओला कंपन्यांच्या संचालकांविरोधात गुन्हे दाखल

मागच्याच आठवड्यात मुंबईत परवानगीशिवाय बाईक टॅक्सी सेवा चालवल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी रॅपिडो आणि ओला कंपन्यांच्या संचालकांविरोधात गुन्हे दाखल केले. अशातच, ही गंभीर घटना घडल्याने मंत्री प्रताप सरनाईक यांनी तातडीची बैठक बोलावली आहे.

कठोर निर्णय घेण्याची शक्यता

या कंपन्यांकडे महाराष्ट्र सरकार किंवा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची (RTA) कोणतीही परवानगी नसतानाही मोबाईल अ‍ॅपद्वारे प्रवासी वाहतूक केली जात असल्याचा आरोप एफआयआरमध्ये नमूद करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, अ‍ॅप-आधारित बाईक टॅक्सी सेवांबाबत राज्य सरकार आता कडक निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in