

कर्जत : कर्जत तालुक्यातील अंजप गावाजवळून वाहणाऱ्या पेज नदीत बुडून दोन विवाहित तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. मृत्युमुखी पडलेले दोघेही जिवलग मित्र असून मित्रपरिवारासह फिरण्यासाठी आणि नदीत पोहण्याचा आनंद घेण्यासाठी ते येथे आले होते.
मृतांमध्ये अजय भास्कर म्हसे (३२) आणि सुनील महेंद्र प्रजापती (३१) यांचा समावेश आहे. माहितीनुसार, २७ मे रोजी हे दोघे आपल्या मित्र व कुटुंबीयांसह अंजप परिसरातील पेज नदीवर आले होते. सायंकाळी सुमारे सहाच्या दरम्यान दोघे नदीत उतरले असता टाटा पॉवरकडून नदीपात्रात अचानक पाणी सोडण्यात आल्याने पाण्याची पातळी झपाट्याने वाढली. त्यामुळे दोघांनाही परिस्थितीचा अंदाज आला नाही आणि ते पाण्यात बुडाले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ पोलिसांना कळविले. त्यानंतर शोधमोहीम राबवून दोघांनाही पाण्याबाहेर काढण्यात आले. मात्र, त्यांना भिवपुरी येथील रायगड हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले.