

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या (KDMC) शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी झालेल्या कथित विलंबाच्या कारणावरून शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी महिला डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी धक्काबुक्की व मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर डॉक्टरांमध्ये संतापाची लाट उसळली असून, आरोपींवर कारवाईची मागणी होत आहे.
घटना सीसीटीव्हीत कैद
सोमवारी (दि. ६) रात्री उपचारास झालेल्या कथित विलंबावरून शास्त्रीनगर रुग्णालयात वाद निर्माण झाला. यावेळी शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे, त्यांचे समर्थक आणि रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टर व कर्मचाऱ्यांशी वाद घालत महिला डॉक्टरला मारहाण केल्याचा आरोप आहे. हा संपूर्ण प्रकार रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
डॉक्टरांचा संप; ओपीडी सेवा बंद
घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी (दि. ७) KDMCच्या सर्व प्रमुख रुग्णालयांतील डॉक्टर, परिचारिका आणि निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले. त्यामुळे नियमित ओपीडी आणि इतर वैद्यकीय सेवा ठप्प झाल्या. मात्र, आपत्कालीन सेवा सुरू ठेवण्यात आल्या. आंदोलनकर्त्यांनी आरोपींना अटक होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे.
रमेश म्हात्रेंसह पाच जणांविरोधात गुन्हा
डॉक्टरांच्या तक्रारीवरून विष्णूनगर पोलिसांनी नगरसेवक रमेश म्हात्रे, अन्य तीन पुरुष आणि एका महिलेविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच महाराष्ट्र मेडिकेअर सेवा व्यक्ती व मेडिकेअर सेवा संस्था (हिंसाचार व मालमत्तेचे नुकसान प्रतिबंध) अधिनियम, २०१० अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
दोषींना पक्षाचा पाठिंबा नाही - श्रीकांत शिंदे
या घटनेवर प्रतिक्रिया देताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत डॉक्टरांवरील हल्ला अत्यंत निषेधार्ह असल्याचे म्हटले. "रुग्णसेवा ही मानवतेची सेवा आहे. कायदा हातात घेणाऱ्यांना कोणतीही माफी दिली जाणार नाही. या हल्ल्यात सहभागी असलेल्या कोणत्याही व्यक्तीला पक्षाचा पाठिंबा दिला जाणार नाही. दोषींवर कायद्यानुसार तसेच पक्षांतर्गत कठोर कारवाई केली जाईल," असे त्यांनी स्पष्ट केले.
मंत्र्यांचीही प्रतिक्रिया
मंत्री भरतशेठ गोगावले यांनी, "ही घटना घडायला नको होती. नेमके काय घडले याची माहिती घेऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील," असे सांगितले. तर मंत्री पंकज भोयर यांनी, "या प्रकरणात तक्रार दाखल झाली असून पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत," असे म्हटले.
IMAचाही इशारा
इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) च्या कल्याण आणि डोंबिवली शाखांनी आरोपींवर तातडीने कारवाई न झाल्यास बुधवारपासून खासगी डॉक्टरही आंदोलनात सहभागी होऊन सेवा बंद ठेवतील, असा इशारा दिला आहे. डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आल्याने या घटनेची राज्यभरात चर्चा सुरू झाली आहे.