राज्यभरात दहीहंडी उत्सवाचा जल्लोष सुरु असताना मुंबई-ठाण्यातही उत्साहाचं वातावरण आहे. आज (दि.१६) मुसळधार पाऊस पडत असतानाही गोविंदा पथकांचा उत्साह मात्र ओसंडून वाहताना दिसत आहे. गेले अनेक वर्ष मुंबई-ठाण्यात मोठमोठ्या दहीहंडीचे भव्य आयोजन केले जाते. कोण किती थर लावणार? याची उत्सुकता नेहमीच पाहायला मिळते. यंदा मात्र, जोगेश्वरीतील कोकणनगर पथकाने मुंबईतील सर्व पथकांना मागे टाकत १० थरांचा विश्वविक्रम केला आहे.
विक्रम मोडून नवा इतिहास
मुंबई-ठाण्यात दहीहंडीमध्ये मानवी थरांचे विशेष आकर्षण पाहायला मिळते. यासाठी दरवर्षी थरांची चढाओढ सुरू असते. लाखोंची बक्षिसे यासाठी दिली जातात. आतापर्यंत जोगेश्वरीतील जय जवान, कोकणनगर आणि आर्यन्स गोविंदा पथकांनी ९ थरांची उंच मानवी रचना करून विक्रम केला होता. मात्र, यंदा कोकणनगर गोविंदा पथकाने सर्वांना मागे टाकत १० थर लावून विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे.
हा विक्रम ठाण्यातील मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडीत नोंदवण्यात आला. संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या वतीने या पथकाला २५ लाख रुपयाचे पारितोषिक जाहीर करण्यात आले. यावेळी हजारोंच्या संख्येने उपस्थित प्रेक्षकांनी घोषणाबाजी व टाळ्यांच्या गजरात या ऐतिहासिक क्षणाला दाद दिली.
जय जवानचा विक्रम मोडीत
मुंबईत ९ थर लावणारे जोगेश्वरीतील प्रसिद्ध गोविंदा पथक जय जवान पथकाचा गाजावाजा होता. मात्र, कोकणनगर पथकाने हा विक्रम मोडीत काढत दहीहंडी उत्सवात आपले नाव कोरले आहे. कोकणनगर पथकाने केलेल्या या विक्रमामुळे सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.