
१९९७ साली किरकोळ वादातून खून करून फरार झालेल्या एका वॉन्टेड आरोपीला तब्बल २८ वर्षांनंतर ठाणे गुन्हे शाखेने अटक केली आहे. राजेंद्र रामदुलार पाल (वय ५०) असे या आरोपीचे नाव असून, तो वसईतील तुंगार फाटा येथे वास्तव्यास असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.
या प्रकरणी गुन्हे शाखा कक्ष - १ काशीमीरा पथकाने अतिशय कौशल्याने तपास करत आरोपीचा मागोवा घेतला. पोलिस निरीक्षक प्रमोद बडख यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई पार पडली.
काय घडलं होतं १९९७ मध्ये?
५ ऑक्टोबर १९९७ रोजी भाईंदर (पूर्व) येथील वासुदेव इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये एका किरकोळ कारणावरून मोठा वाद झाला होता. आरोपी विजयसिंग आणि त्याच्या दोन साथीदारांनी एका इमारतीवरून कचरा खाली गटारात टाकला. त्यामुळे फिर्यादी व त्यांच्या मित्रांच्या अंगावर घाण पाणी उडाले. यावरून वाद उफाळून निघाला.
वाद विकोपाला गेल्यावर आरोपींनी धर्मनाथ रामशंकर पांडे यांच्या डोक्यात बांबूने जोरदार मारहाण केली. या हल्ल्यात ते गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडले. याप्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध कलम ३०२ आणि ५०४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांपासून लपण्यासाठी बदलली ओळख
खून केल्यानंतर आपल्याला अटक होऊ नये यासाठी राजेंद्र पाल याने आपली ओळख आणि स्थान सतत बदलले. तो पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेश अशा विविध राज्यांमध्ये मजूर म्हणून काम करत होता. तपास पथकाने गुप्त माहिती आणि तांत्रिक तपास यांच्या आधारे पालचा वसई पूर्वेकडे माग काढला आणि अखेर त्याला अटक करण्यात यश आले.
प्राथमिक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यानंतर पुढील कारवाईसाठी त्याला भाईंदर पोलीस ठाण्याकडे सुपूर्त करण्यात आले आहे.
पीडित कुटुंबाला न्याय मिळण्याची आशा
या अटकेमुळे २८ वर्षांपासून तग धरून बसलेल्या पांडे कुटुंबीयांना आता न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक प्रमोद बडख यांच्या नेतृत्वाखाली ही यशस्वी कारवाई करण्यात आली.