ठाणे : भिवंडी तालुक्यातील वडपे गावातील रिचलँड कंपाउंड परिसरात आज (१२ मे) सकाळी भीषण आग लागली. या आगीत एकूण २२ गोदामे जळून खाक झाली असून, पाच मोठ्या कंपन्या आणि एका मंडप सजावटीच्या गोदामाचे मोठे नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच भिवंडी आणि कल्याण येथून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
जळालेल्या गोदामांमध्ये मोठ्या प्रमाणात रसायने, प्रिंटिंग मशिन्स, इलेक्ट्रॉनिक वस्तू, प्रथिनेयुक्त आरोग्य अन्न पावडर, सौंदर्यप्रसाधने, कपडे, शूज, फर्निचर आणि मंडप सजावटीचे साहित्य साठवलेले होते. त्यामुळे आगीने मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहेत.
नुकसान झालेल्या प्रमुख कंपन्यांची नावे:
केके इंडिया पेट्रोलियम स्पेशालिटीज प्रायव्हेट लिमिटेड
कॅनन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड
ब्राइट लाईफकेअर प्रायव्हेट लिमिटेड
होलिसोल प्रायव्हेट लिमिटेड
अॅबॉट हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून यासंदर्भात अधिक तपास सुरू आहे.