
घोडबंदरच्या कावेसर परिसरात म्हाडाची इमारत आहे. गेल्यावर्षी मार्च २०२१ पासून या ठिकाणी नागरिकांना घराचा ताबा देण्यास सुरूवात झाली आहे.
गेल्यावर्षापासून शकडो रहीवासी या इमारतीत राहात असून गेल्यावर्षी पहिल्याच पावसात या इमारतीच्या निकृष्ट दर्जाच्या कामाचा पर्दाफाश झाला होता. ज्या घरामंध्ये नागरिक रहायला आले आहेत. त्यातील बहुतांशी घरांच्या भिंती पाझरल्या होत्या आणि घरात पाणी आल्याने पाणी उपसण्याची वेळ नागरिकांवर आली होती.
अद्याप या इमारतींची देखभाल दुरुस्ती म्हाडाकडे असून गेल्यावर्षी वेळोवेळी तक्रारी करूनही दुरस्ती करण्यात आली नसल्याने सलग दुसऱ्या पावसाळ्यातही म्हाडा इमारतींच्या भिंती पाझरल्या आहेत.
म्हाडाच्या पुनर्विकास योजनेतून मे गुरुकृपा डेव्हलपर्स यांनी मालक कोकण गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळ अर्थात म्हाडा साठी १४ मजल्याचे दोन टॉवर बांधून दिले आहेत या ठिकाणी म्हाडाकडून २०१५ साली घरांची सोडत काढण्यात आली. त्यानंतर जवळपास पाच वर्षे इमारतीचे काम सुरु होते तर २०२०च्या सुरूवातीला पहिला हप्ता स्विकारण्यात आला तर दुसऱ्या हप्त्यासाठी एप्रिल २०२०ची मुदत देण्यात आली. याच दरम्यान देशात कोरोनाने कहर केलेला असल्याने लॉकडाऊन जाहीर करण्यात आला त्यामुळे ज्या विजेत्यांनी घरासाठी कर्जं मंजूर करून घेतले होते त्याची पूर्तता वेळेत करण्यात आली नाही त्यामुळे २०२०च्या शेवटी नव्याने गृहकर्जासाठी प्रयत्न सुरु करावे लागले.
विशेष म्हणजे डिसेंबर २०२० प्रयत्न म्हाडाने गृहकर्जावरील व्याजाला स्थगिती दिली होती मात्र तरी बहुतांशी सोडत विजेते कागदपत्रांची पूर्तता तसेच दुसऱ्या हप्त्याची रक्कम वेळेत देऊ शकले नव्हते त्यामुळे अजूनही बहुतांशी नागरिकांना आपल्या घराचा ताबा वेळेत घेता आला नव्हता.
दुसरीकडे ज्या नागरिकांनी आपल्या घेतलेला आहे त्यांना अगदी सुरवाती पासून अडचणीचा सामना करावा लागतो आहे. काही घरांच्या भिंतींना तडे गेले होते त्यामुळे त्यांची दुरुस्ती करून घ्यावी लागली तर नियमाप्रमाणे पूर्ण क्षमतेने सौरऊर्जा यंत्रणा, रेन वाटर हार्वेस्टिंग यंत्रणा कार्यान्वित झालेल्या नाहीत.
विशेष म्हणजे गेल्यावर्षी पासून पुरेसे पाणी मिळत नसल्यामुळे टँकरने पाणी मागवण्याची वेळ नागरिकांवर आलेली असताना आता सलग दुसऱ्या पावसाळ्यातही घरांच्या भिंती झिरपू लागल्याने म्हाडा इमारतीत घरं घेतलेल्या नागरिकांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.