

ठाणे : सर्वसामान्यांना परवडतील अशी घरे निर्माण करणार असून यासाठी म्हाडाचे नवीन धोरण लवकरच आणणार असल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. या नव्या धोरणामध्ये परवडणारी घरे, परवडणारे भाडे, हॉस्टेल घर, ज्येष्ठ नागरिकांना घरे तसेच विद्यार्थ्यांसाठी हाऊसिंग अशा घरांचा समावेश असेल अशी माहिती उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली.
पुणे गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळाच्या ३ हजार ६६२ सदनिकांची संगणकीय सोडत समारंभ दूरदृश्यप्रणालीद्वारे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात झाला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली. आपल्या भाषणात उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले ३ हजार ६६२ घरांची आज सोडत काढण्यात आली. ३ हजार ६६२ घरांसाठी एकूण ९० हजार अर्ज आले होते, त्यामुळे घरांसाठी मागणी प्रचंड असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
गेल्या दीड वर्षात जवळपास ३० हजार घरे म्हाडाने दिली. साडे पाच लाख लोकांची घरांची मागणी होती. हक्काचे घर,स्वप्नांचे घर आणि सर्वसामान्यांना परवडणारी घर देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला. लोकांना परवडतील अशा घरांची निर्मिती करण्यासाठी लवकरच म्हाडाचे नवीन धोरण आणणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केली. या धोरणामध्ये परवडणारी घरे, परवडणारे भाडे, हॉस्टेल घर, ज्येष्ठ नागरिकांना घर, विद्यार्थ्यांसाठी हाऊसिंग अशा अनेक घरांचा समावेश यामध्ये असणार आहे. समाजाच्या प्रत्येक घटकाचा विचार करून आम्ही निर्णय घेतोय, यामध्ये गिरणी कामगारांना घर, पोलिसांना घर, गरीब डबेवाल्यांचा देखील विचार आम्ही करत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. शहरी आणि ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणावर लोकांना परवडणारी घर मिळाली पाहिजे ही भूमिका आमची आहे, राखडलेले प्रकल्प मग झोपडपट्टी, म्हाडा, धोकादायक इमारती ते देखील आम्ही मार्गी लावत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. यावेळी पुणे गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, ठाणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे उपस्थित होते.
घरांच्या दर्जाकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना
आपल्यावर लोकांनी जो विश्वास लोकांनी दाखवलेला आहे तो कायम टिकवण्यासाठी आपल्याला घरांच्या दर्जाकडे, घर देण्याच्या वेळेमध्ये त्याच्याबरोबर घर देण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता ठेवण्याच्या सूचना मी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. झोपडपट्टी मुक्त शहर झाली पाहिजेत यासाठीच सर्व एजन्सीजला आम्ही एकत्रित घेऊन टप्पाटप्याने काही प्रकल्प दिले तर लोकांची गैरसोय होणार नाही आणि त्यांना वेळेत घर मिळतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
रखडलेले प्रकल्प मार्गी लावणार
डेव्हलपरने सोडून दिलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी एसआरए, म्हाडा, सिडको, एमआयडीसी आणि बीएमसी त्याच्याबरोबर ज्या काही आमच्या एजन्सीज आहेत त्यांच्या माध्यमातून राखडलेले प्रकल्प आम्ही टप्प्याटप्प्याने मार्गी लावणार आहोत. खास करून मुंबईतले रखडलेले प्रकल्प, मुंबईतला जो माणूस बाहेर फेकला गेलेला आहे. त्याला पुन्हा मुंबईत आणण्यासाठी मुंबईतले प्रकल्प देखील पुढे नेतोय, मुंबई, ठाणे, पुणे एवढेच नाही तर संपूर्ण राज्यभरात ही पॉलिसी आम्ही राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले.