

ठाणे : राज्यातील उघड्या विहिरींमुळे घडणाऱ्या भीषण दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण अभ्यासक डॉ. प्रशांत रवींद्र सिनकर यांनी राज्य सरकारचे लक्ष वेधले आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महत्त्वपूर्ण निवेदन सादर केले असून, विहिरी बुजवण्याऐवजी त्यांचे “सुरक्षित जलस्रोत” म्हणून जतन व संवर्धन करण्याची भूमिका मांडली आहे.
दिंडोरी आणि कंकराळा येथे विहिरीत पडून झालेल्या अलीकडील दुर्घटनांमुळे राज्यभरात चिंता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर केवळ विहिरी बुजवण्याचा उपाय पर्यावरणदृष्ट्या घातक ठरू शकतो, असे डॉ. सिनकर यांनी नमूद केले. विहिरी भूजल पुनर्भरणासाठी अत्यंत महत्त्वाच्या असून स्थानिक पर्यावरणाचा अविभाज्य भाग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विहिरी बुजवल्यास भविष्यात पाणीटंचाईची समस्या अधिक गंभीर होऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला आहे. निवेदनात राज्य शासनाने तातडीने काही ठोस उपाययोजना राबवण्याची मागणी करण्यात आली आहे.
यामध्ये राज्यातील सर्व विहिरींचे ‘सुरक्षा ऑडिट’ करून रिस्क मॅपिंग करणे, प्रत्येक विहिरीभोवती किमान चार फूट उंच संरक्षक भिंत व लोखंडी जाळी बसवणे, तसेच वनक्षेत्रालगतच्या विहिरींमध्ये वन्यजीवांसाठी ‘एस्केप रॅम्प’ तयार करणे यांचा समावेश आहे. याशिवाय, या कामांसाठी मनरेगा किंवा जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून आर्थिक तरतूद करावी, तसेच रात्रीच्या वेळी अपघात टाळण्यासाठी विहिरींच्या परिसरात रेडियम पट्ट्या आणि इशारा फलक लावावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान, या विषयावर राज्य शासनाने गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर शास्त्रोक्त आणि पर्यावरणपूरक धोरण जाहीर करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
राज्यातील सर्व विहिरींचे ‘सुरक्षा ऑडिट’ करून रिस्क मॅपिंग करणे, प्रत्येक विहिरीभोवती किमान चार फूट उंच संरक्षक भिंत व लोखंडी जाळी बसवणे, तसेच वनक्षेत्रालगतच्या विहिरींमध्ये वन्यजीवांसाठी ‘एस्केप रॅम्प’ तयार करून विकास आणि पर्यावरणीय संतुलन यांचा समतोल राखणे ही काळाची गरज आहे. उघड्या विहिरी आज मानवी आणि वन्यजीवांसाठी अदृश्य मृत्यू सापळे ठरत आहेत. त्यामुळे त्यांचे संरक्षण आणि सुरक्षिततेसाठी एकात्मिक धोरण आवश्यक आहे.
डॉ. प्रशांत रवींद्र सिनकर, पर्यावरण अभ्यासक