

ठाणे : उद्धवसेनेचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणावरून ठाण्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत मीनाक्षी शिंदे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा द्यावा, असे मत परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केले. याबाबतच्या भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही कळवल्याचे त्यांनी सांगितले. ठाण्यातील आनंद आश्रम येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी खासदार नरेश म्हस्के उपस्थित होते.
एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या नेत्यांवर चुकीचे आरोप होत असताना गप्प बसणार नाही, असा इशारा सरनाईक यांनी दिला. मंत्रिपद टिकवण्यासाठी नेत्यांवरील आरोप सहन करण्याचा प्रश्नच नसल्याचे सांगत, शिंदे आणि शिवसेनेविरोधात चुकीचे कथानक पसरवले जात असेल, तर त्याला प्रत्युत्तर दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पूर्णेकर हत्या प्रकरणातील कथित १७ लाख रुपयांच्या व्यवहारावरून एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करणाऱ्यांनी पुरावे सादर करावेत; अन्यथा नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करू. पूर्णेकर कुटुंबीयांच्या दुःखाचा राजकीय फायदा घेऊन शिंदे आणि शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही.कुटुंबीयांना तपासाबाबत शंका असल्यास त्यांनी विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) आपली बाजू मांडावी.
नरेश म्हस्के, खासदार