Thane : शहापूरमध्ये चक्क सिगारेट वेंडिंग मशीन; रात्री १० नंतरही UPI वर मिळते सेवा, नेटकरी म्हणतात...

शहापूर तालुक्यातील आसनगाव परिसरात बसवण्यात आलेल्या सिगारेट वेंडिंग मशीनचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. UPI द्वारे पैसे भरून सिंगल सिगारेट किंवा पूर्ण पाकीट घेता येणारी ही मशीन पाहून काही जण आश्चर्यचकित झाले आहेत, तर काहींनी यावर टीकाही केली आहे.
शहापूरमध्ये चक्क सिगारेट वेंडिंग मशीन
शहापूरमध्ये चक्क सिगारेट वेंडिंग मशीन
Published on

ठाणे : शहापूर तालुक्यातील आसनगाव परिसरात बसवण्यात आलेल्या सिगारेट वेंडिंग मशीनचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. UPI द्वारे पैसे भरून सिंगल सिगारेट किंवा पूर्ण पाकीट घेता येणारी ही मशीन पाहून काही जण आश्चर्यचकित झाले आहेत, तर काहींनी यावर टीकाही केली आहे.

व्हिडिओ व्हायरल कसा झाला?

कंटेंट क्रिएटर आदित्य गजरे याने सोशल मीडियावर या मशीनचा व्हिडिओ शेअर केला आणि तो काही तासांतच व्हायरल झाला. मशीनवर विविध सिगारेट ब्रँड्स आणि त्यांचे बटण क्रमांक दिलेले दिसतात. ग्राहकाने हवी ती सिगारेट निवडायची, UPI द्वारे पेमेंट करायचं आणि काही सेकंदांत मशीनमधून सिगारेट बाहेर येते.

व्हिडिओमध्ये आदित्य आणि त्याचे मित्र प्रात्यक्षिक करून दाखवतात. दरम्यान ते 'मार्लबोरो क्लोव्ह मिक्स'सिगारेटची निवड करतात. त्यानंतर दिलेला क्रमांक दाबून UPI पेमेंट पूर्ण करतात. काही सेकंदांत मशीनचा स्लॉट आपोआप उघडतो आणि प्लास्टिकमध्ये नीट पॅक केलेली सिंगल सिगारेट बाहेर येते.

ही संपूर्ण प्रक्रिया पाहून अनेकांनी याला "मॉडर्न सुविधा" म्हणून कौतुक केलं, तर काहींनी आरोग्य आणि सामाजिक परिणामांच्या दृष्टीने प्रश्नही उपस्थित केले.

मशीन कोणी तयार केली?

अधिक माहिती मिळवण्यासाठी 'फ्री प्रेस जर्नल'ने मशीनवर दिलेल्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधला. हा क्रमांक शहापूर-आसनगाव येथील साईराज एंटरप्रायझेसचे गणेश जाधव आणि धीरज चव्हाण यांचा असल्याचे स्पष्ट झाले. संबंधित मशीनची निर्मिती त्यांच्या कंपनीमार्फत करण्यात आली आहे.

गणेश जाधव म्हणाले, "ही मशीन माझी असून मी, माझे मेव्हणे आणि काही अभियंत्यांनी मिळून आम्ही ही मशीन तयार केली आहे. ग्रामीण भागात विविध वस्तू सहज उपलब्ध व्हाव्यात, यासाठी पुढे आणखी मशीन तयार करण्याचा आमचा विचार आहे."

सिगारेट मशीन बसवण्यामागचं कारण काय?

गणेश जाधव यांच्या मते, परिसरात धूम्रपान करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. रात्री १० नंतर दुकाने बंद होतात आणि लोकांना ४-५ किलोमीटर दूर जावं लागतं. "एकदा दोन तरुण सिगारेट आणण्यासाठी बाहेर गेले असताना त्यांचा अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर ही कल्पना सुचली. ज्यांनी धूम्रपान करायचं ठरवलं आहे, त्यांच्यासाठी सुरक्षित आणि सोयीची व्यवस्था व्हावी, एवढाच उद्देश आहे," असं त्यांनी स्पष्ट केलं.

ते पुढे म्हणाले, "हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ही मशीन चर्चेत आली आहे. मात्र, आम्ही हे मशीन सध्या चाचणी स्वरूपात बसवले असून भविष्यात ते पूर्णपणे कार्यान्वित करायचे की नाही, याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही."

व्हायरल व्हिडिओ

आरोग्य आणि नैतिकतेवर प्रश्न

या मशीनमुळे धूम्रपानाला चालना मिळेल का? या प्रश्नावर जाधव म्हणाले, "धूम्रपान हा वैयक्तिक निर्णय आहे आणि मी त्याचा प्रचार करत नाही. मशीनवर सर्व आरोग्यविषयक सूचना स्पष्टपणे नमूद केल्या आहेत. त्यामुळे शेवटी हा प्रत्येकाचा स्वतःचा निर्णय आहे."

इंस्टाग्राम

सोशल मीडियावर प्रतिक्रिया

या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काहींनी याला "नवीन युगाची सुविधा" म्हटलं, तर काहींनी तरुणांमध्ये धूम्रपान वाढण्याची भीती व्यक्त केली. एका युजरने लिहिले, "अरे यही तो है अच्छे दिन, मेरा देश बदल रहा है." तर दुसऱ्या युजरने प्लास्टिक पॅकेजिंगमुळे कचरा वाढेल, अशी चिंता व्यक्त केली आहे.

दरम्यान, शहापूरमधील या मशीनमुळे ‘सोय की धोका?’ असा प्रश्न उपस्थित झाला असून, चर्चेला नवा आयाम मिळाला आहे.

logo
marathi.freepressjournal.in