टॉयलेटमध्ये रक्ताचे डाग आढळले, मासिक पाळीच्या संशयातून विद्यार्थिनींना विवस्त्र करून तपासले; शहापूरमधील शाळेत धक्कादायक प्रकार

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील एका खासगी शाळेत अत्यंत अमानवी आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेतील शौचालयात रक्ताचे डाग आढळल्याने विद्यार्थिनींना मासिक पाळी आली आहे का, हे तपासण्यासाठी त्यांचे गणवेश उतरवून तपासणी करण्यात आली. या घटनेनंतर संतप्त पालकांनी शाळेविरोधात तीव्र आंदोलन केले असून, पोलिसांनी मुख्याध्यापिका आणि एका महिला कर्मचाऱ्याला अटक केली आहे.
टॉयलेटमध्ये रक्ताचे डाग आढळले, मासिक पाळीच्या संशयातून विद्यार्थिनींना विवस्त्र करून तपासले; शहापूरमधील शाळेत  धक्कादायक प्रकार
Published on

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील एका खासगी शाळेत अत्यंत अमानवी आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेतील शौचालयात रक्ताचे डाग आढळल्याने विद्यार्थिनींना मासिक पाळी आली आहे का, हे तपासण्यासाठी त्यांचे गणवेश उतरवून तपासणी करण्यात आली. या घटनेनंतर संतप्त पालकांनी शाळेविरोधात तीव्र आंदोलन केले असून, पोलिसांनी मुख्याध्यापिका आणि एका महिला कर्मचाऱ्याला अटक केली आहे.

ही घटना मंगळवारी (दि. ८) शहापूर येथील आर. एस. दमानिया या शाळेत घडली. शाळेच्या शौचालयात रक्ताचे डाग आढळल्याने पाचवी ते दहावीच्या वर्गांतील अनेक विद्यार्थिनींना कन्वेन्शन हॉलमध्ये बोलावण्यात आले. जमिनीवर आणि भिंतीला लागलेल्या डागांचे फोटो प्रोजेक्टरवर दाखवून, त्यांना विचारण्यात आले की, त्यांच्यापैकी कोणाला मासिक पाळी आली आहे का?

ज्यांनी पाळी सुरू असल्याचे सांगितले, त्यांच्याकडून अंगठ्याचे ठसे घेतले गेले. मात्र, ज्यांनी नकार दिला, त्यांना एकामागून एक शौचालयात नेण्यात आले. तिथे एका महिला सफाई कर्मचाऱ्याने त्यांच्या अंगावरचा गणवेश उतरवून पाळी सुरू आहे की नाही, याची तपासणी केली.

हा अपमानकारक प्रकार विद्यार्थिनींनी घरी जाऊन रडत पालकांना सांगितला. यानंतर संतप्त पालकांनी बुधवारी (दि.९) शाळेत धाव घेत आंदोलन सुरू केले. शाळेच्या आवारात निदर्शने करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. नंतर, त्यांनी पोलीस ठाण्याबाहेरही ठिय्या आंदोलन करत, व्यवस्थापन आणि संबंधित शिक्षकांवर कारवाईची मागणी केली.

या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात मुख्याध्यापिका, चार शिक्षक, एक महिला सफाई कर्मचारी आणि दोन विश्वस्त अशा आठ जणांविरोधात भारतीय दंड संहिता कलम ७४, कलम ७६ , तसेच POCSO कायद्याच्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी बुधवारी रात्री मुख्याध्यापिका आणि संबंधित महिला कर्मचाऱ्याला अटक केली आहे.

घटनेचे परिणाम -

या प्रकारामुळे विद्यार्थिनींच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शाळेतील सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, पालकांमध्ये संताप आणि असुरक्षिततेची भावना आहे. शाळेत मुलींचा असा अपमान होणे हे केवळ बेकायदेशीरच नव्हे, तर अमानवी आणि लज्जास्पद आहे. पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याचे सांगितले आहे.

logo
marathi.freepressjournal.in