काहीतरी लपवण्याचा प्रयत्न सुरू आहे! अजित पवार यांच्या अपघातावरून शशिकांत शिंदे यांची टीका

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी करण्यात आलेल्या चौकशीचा अहवाल अद्याप जाहीर करण्यात आलेला नसल्याने राष्ट्रवादी (शरद पवार) ने राज्य सरकारवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
काहीतरी लपवण्याचा प्रयत्न सुरू आहे! अजित पवार यांच्या अपघातावरून शशिकांत शिंदे यांची टीका
काहीतरी लपवण्याचा प्रयत्न सुरू आहे! अजित पवार यांच्या अपघातावरून शशिकांत शिंदे यांची टीकासंग्रहित छायाचित्र
Published on

ठाणे : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी करण्यात आलेल्या चौकशीचा अहवाल अद्याप जाहीर करण्यात आलेला नसल्याने राष्ट्रवादी (शरद पवार) ने राज्य सरकारवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सीआयडी चौकशी झाली, पण तिचा अहवाल आजपर्यंत समोर आलेला नाही. यामागे काहीतरी दडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची शंका निर्माण होते, अशी टीका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सोमवारी ठाण्यात व्यक्त केली.

ठाणे महापालिकेतील गटनेते अभिजीत पवार यांच्या नवीन कार्यालयाच्या उद्घाटनासाठी ते ठाण्यात आले होते. या कार्यक्रमाला आमदार जितेंद्र आव्हाड, विरोधी पक्षनेते अश्रफ ऊर्फ शानू पठाण, शहराध्यक्ष मनोज प्रधान तसेच पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना शिंदे यांनी राज्य सरकारच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

ते म्हणाले की, अजित पवार यांच्या अपघातानंतर राज्यभरातून निष्पक्ष चौकशीची मागणी झाली होती. अनेक राजकीय पक्षांनी सीबीआय चौकशीची मागणी लावून धरली होती. स्वतः सुनेत्रा पवार यांनीही या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी व्हावी, अशी भूमिका घेतली होती. मात्र सरकारने सीबीआय चौकशी न करता सीआयडीमार्फत तपास सुरू केला आणि त्याचाही अहवाल अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नाही. जर सर्व काही पारदर्शक असेल, तर अहवाल जाहीर करण्यात अडचण काय आहे? सरकार कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे का? या प्रकरणात सत्य बाहेर येऊ नये म्हणून मुद्दाम विलंब केला जात असल्याचा संशय जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. योग्य वेळी जनता या सर्वाचा जाब विचारेल, असेही ते म्हणाले.

काहीतरी लपवण्याचा प्रयत्न सुरू आहे! अजित पवार यांच्या अपघातावरून शशिकांत शिंदे यांची टीका
मोदी सरकारमुळे देशाची अर्थव्यवस्था कमकुवत! विरोधकांची पंतप्रधान व भाजपवर जोरदार टीका

पंतप्रधानांनी स्वतःपासून सुरुवात करावी!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केलेल्या पेट्रोल-डिझेल वापर आणि सोन्याच्या खरेदीसंदर्भातील आवाहनावरूनही शिंदे यांनी केंद्र सरकारवर टीका केली. ‘रुपयाची किंमत डॉलरच्या तुलनेत घसरत आहे. महागाई दिवसेंदिवस वाढत असून सामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडत आहे.

पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाची सुरुवात स्वतःपासून करावी,’ असा टोला त्यांनी लगावला. देशातील अनेक गॅसआधारित उद्योग बंद पडत असून अर्थव्यवस्था गंभीर संकटातून जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, इराणबरोबर मैत्रीचे संबंध होते. मात्र, आता ते बिघडल्यामुळे इराणला टोल द्यावा लागणार आहे. त्याचा भूर्दंड लोकांकडून वसूल केला जाणार आहे. लोकांच्या खिशातून हा पैसा जाणार आहे. मोदींची परराष्ट्र नीती चुकल्याचा हा सगळा फटका आहे, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in