राहुल जयस्वाल हत्या प्रकरणात सहा आरोपी अटकेत; तडीपार रॉबिन करोतिया फरार

या वादातून बाबू ढकणीने काही वर्षांपूर्वी राहुल याची दुचाकी देखील जाळली होती.
राहुल जयस्वाल हत्या प्रकरणात सहा आरोपी अटकेत; तडीपार रॉबिन करोतिया फरार
Published on

उल्हासनगर : उल्हासनगर कॅम्प क्रमांक तीन येथील इमलीपाडा परिसरात पहाटेच्या सुमारास राहुल जयस्वाल नावाच्या २५ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. ही हत्या सात जणांनी मिळून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते. या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या पथकाने चोवीस तासाच्या आत विविध ठिकाणी धाडसत्र मोहीम राबवत सहा आरोपींना अटक केली आहे. मात्र या हत्या प्रकरणात सहभागी असलेला तडीपार आरोपी रॉबिन करोतिया हा आद्यपही फरार आहे.

मयत राहुल जयस्वाल याचे त्यात परिसरात राहणाऱ्या बाबू ढकणी आणि त्याच्या साथीदारांसोबत अनेक वर्षांपासून वाद सुरू होते. या वादातून बाबू ढकणीने काही वर्षांपूर्वी राहुल याची दुचाकी देखील जाळली होती. या प्रकरणात पोलिसांनी बाबूला अटक केली होती. यामुळे दोघांमधील संघर्ष आणखीच वाढला होता. दरम्यान गुरुवारी पहाटेच्या सुमारास बाबू ढकणी याच्यासह बसंत ढकणी, प्रणय शेट्टी, करण ढकणी, संतोष साळवे, प्रफुल कुमावत, रॉबिन करोतिया यांनी राहुलच्या घरावर दगडफेक केली. याबाबत मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी जात असतांना आरोपींनी राहुल याला गाठून बेदम मारहाण केली, तसेच त्याच्या डोळ्यात मिरची स्प्रे आणि डोक्यात लादी घालून त्याची निर्घृण हत्या केली.

या घटनेने संपूर्ण उल्हासनगर शहरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे, सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल कोळी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाच्या वतीने विविध ठिकाणी धाडसत्र मोहीम राबविण्यात आली.

सात दिवसांची पोलीस कोठडी

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांकडून बाबू ढकणी, बसंत ढकणी, प्रणय शेट्टी, संतोष साळवे, करण ढकणी, प्रफुल कुमावत या सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणातील आरोपी रॉबिन करोतिया हा अद्याप देखील फरार असून त्याला शोधण्यासाठी देखील पोलीस पथके रवाना करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच आज अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

logo
marathi.freepressjournal.in