

ठाणे : भिवंडी येथील जलमय रस्त्यांवरील खड्ड्यांतून नागरिकांना वाट काढण्यास मदत करणाऱ्या एका ‘स्पायडरमॅन’चा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी या तरुणाच्या अनोख्या उपक्रमाचे आणि संवेदनशीलतेचे जोरदार कौतुक केले आहे.
ठाणे जिल्ह्यात सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे भिवंडी आणि आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे तेथील खड्डे वाहनचालकांना दिसेनासे झाले होते, ज्यामुळे अनेक वाहनांचा तोल जाऊन अपघात होण्याची भीती निर्माण झाली होती.
नागरिकांची हीच अडचण पाहून भिवंडीतील स्थानिक कंटेंट क्रिएटर शादाब मोमीन याने मदतीचा हात पुढे केला. थेट ‘स्पायडरमॅन’चा पोशाख परिधान करून तो रस्त्यावर उतरला आणि अडकलेल्या लोकांना मदत करू लागला. व्हायरल व्हिडीओमध्ये शादाब दोन लहान मुलांना आपल्या खांद्यावर बसवून सुरक्षितपणे रस्ता ओलांडून नेताना दिसत आहे. याशिवाय, पाण्यात अडकलेल्या वाहनांना पुढे जाण्यासाठीही तो मदत करताना पाहायला मिळत आहे.
रस्त्यांवर पाणी का साचते?
या अनोख्या कामगिरीबाबत बोलताना शादाब मोमीन याने सांगितले की, त्याचा उद्देश केवळ रहिवाशांना मदत करणे हाच नव्हता, तर दरवर्षी उद्भवणाऱ्या या गंभीर नागरी समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधणे हाही होता.
दरवर्षी रस्त्यांची दुरुस्ती आणि नालेसफाईसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातो, तरीही प्रत्येक मुसळधार पावसानंतर रस्त्यांवर पाणी का साचते, असा सवाल त्याने या निमित्ताने उपस्थित केला आहे.