

नवी दिल्ली : ठाणे जिल्ह्यातील महापालिका रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी आरोपी असलेले शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांचा जामीन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला असून, त्यांना पुढील तीन दिवसांत शरण येण्याचे आदेश दिले आहेत
वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा हल्ला खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट आणि कडक संदेश समाजात गेला पाहिजे. डॉक्टर लोकांची सेवा करतात आणि त्यांच्यावर अशा प्रकारे हल्ला केला जाऊ शकत नाही, अशा अत्यंत कडक शब्दांत फटकारत सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी एक महत्त्वाचा निर्णय दिला.
न्या. विक्रम नाथ आणि न्या. संदीप मेहता यांच्या खंडपीठाने महाराष्ट्र शासनाच्या याचिकेवर सुनावणी करताना हा निर्णय दिला. म्हात्रे प्रकरणानंतरही संबंधित पक्षाशी संबंधित अशीच दुसरी घटना घडल्याची नोंद सर्वोच्च न्यायालयाने या सुनावणीदरम्यान घेतली.
निर्दोष मुक्ततेचा दावा
नगरसेवक म्हात्रे यांच्या वतीने वरिष्ठ वकील सिद्धार्थ दवे यांनी न्यायालयात सांगितले की, या प्रकरणात दोन साक्षीदारांची चौकशी पूर्ण झाली आहे. ३ ऑक्टोबर रोजी तक्रारदार महिला डॉक्टरची साक्ष नोंदवली जाणार आहे. खटल्याचे काम सुरू असून त्यात कोणताही अडथळा आणला गेलेला नाही. म्हात्रे यांनी यापूर्वीच काही काळ कोठडीत घालवला आहे. हा गुन्हा दंडाधिकाऱ्यांसमोर चालणारा असून त्यात जास्तीत जास्त पाच वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. ६० पैकी २ साक्षीदार आधीच तपासले गेले आहेत. तसेच म्हात्रे यांच्यावर दाखल असलेले इतर गुन्हे राजकीय प्रेरित होते आणि त्यातील १८ प्रकरणांतून त्यांची निर्दोष मुक्तता झाली आहे, असा दावाही त्यांनी केला.