उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यात सोमवारी (दि. १३) ठाकरे गट आणि मनसेने धडक मोर्चा काढला. ठाणे महानगरपालिकेतील वाढता भ्रष्टाचार, गैरव्यवस्थापन आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या मूलभूत समस्या याच्या निषेधार्थ ठाकरे गट आणि मनसे एकवटले. या मोर्च्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानेही सहभाग नोंदवला, तर काँग्रेस पक्ष मात्र सहभागी झाला नाही.
या आंदोलनाची सुरुवात गडकरी रंगायतन येथून सुरू झाली. तर, ठाण्यातील तृणमूल काँग्रेसच्या मुख्यालयासमोर मोर्चाची सांगता झाली. या आंदोलनात भास्कर जाधव, राजन विचारे, अविनाश जाधव आणि जितेंद्र आव्हाड यांच्यासह ठाण्यातील अनेक स्थानिक नेते, दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने सामान्य नागरिक सहभागी झाले. दोन्ही पक्षांचे झेंडे, घोषणाबाजी आणि बॅनरने संपूर्ण मार्ग व्यापला होता. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
ठाणे भ्रष्टाचाराने गुदमरलेलं शहर बनलं - राजन विचारे
मोर्चादरम्यान भाषण करताना ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार राजन विचारे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर थेट टीका केली. "ठाणेकरांच्या विश्वासाला तडा देऊन सत्ता मिळवणाऱ्यांचा गट हा देशद्रोह्यांचा आहे. ठाणे हे कधी काळी शिवसेनेचा बालेकिल्ला होता, पण आज भ्रष्टाचाराने गुदमरलेलं शहर बनलं आहे."
दोन्ही पक्ष कायमचे एकत्र - रवींद्र मोरे
मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी म्हटले, "हा मोर्चा ही केवळ सुरुवात आहे. ठाणे शहराला भ्रष्टाचार आणि गैरव्यवस्थापनातून मुक्त करणे हे आमचं एकत्रित ध्येय आहे. दोन्ही पक्ष कायमचे एकत्र आले आहेत आणि पुढेही असेच संयुक्त आंदोलन करत राहणार आहोत."
मनसेचे अविनाश जाधव यांनीही हीच भूमिका स्पष्ट करत म्हटलं, "ठाण्याची पायाभूत सुविधा कोलमडली आहे. रस्ते, पाणी, कचरा व्यवस्थापन, वाहतूक सगळीकडे नागरिक त्रस्त आहेत. आता या विरोधात लढा तीव्र करणार."
एकत्र आलेल्या शक्तींचा आरंभ - केदार दिघे
ठाकरे गटाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे म्हणाले, "हा मोर्चा म्हणजे ठाकरे बंधूंच्या विचारांनी पुन्हा एकत्र आलेल्या शक्तींचा आरंभ आहे. मनसेसोबत आम्ही ठाण्यातील सर्व नागरी प्रश्नांवर एकत्र लढणार आहोत. नागरिकांच्या अडचणींचं राजकारण न करता उपाय हवे आहेत."