
घोडबंदर रोडवरील कासारवडवली परिसरात सोमवारी (दि. ११) दुपारी पोहण्यासाठी गेलेल्या १२ वर्षीय मुलाचा तलावात बुडून मृत्यू झाला. पियुष गजानन सोनवणे असे मृत मुलाचे नाव असून तो वाघबीळ येथील झुम्मा नगर परिसरात राहत होता आणि इयत्ता पाचवीत शिक्षण घेत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी साडेबारा वाजता पियुष राम मंदिराजवळील तलावात पोहण्यासाठी गेला होता. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात गेला आणि बुडाला. घटनेची माहिती मिळताच कासारवडवली पोलीस, ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, ठाणे आपत्ती प्रतिसाद दल (TDRF) आणि अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
बचाव पथकाने शोध घेऊन पियुषला तलावातून बाहेर काढले आणि रुग्णवाहिकेतून ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.