Thane : भिवंडीत डॉ. बाबासाहेबांच्या श्रद्धांजली बॅनरचा अपमान; दोघांविरोधात गुन्हा दाखल

भिवंडी तालुक्यातील कवाड गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लावलेला श्रद्धांजली बॅनर अज्ञात समाजकंटकांनी फाडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या कृत्यामुळे सार्वजनिक भावना दुखावल्या असून सामाजिक सलोखा धोक्यात आल्याची भावना व्यक्त होत आहे. संतापाच्या पार्श्वभूमीवर भिवंडी तालुका पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
Thane : भिवंडीत डॉ. बाबासाहेबांच्या श्रद्धांजली बॅनरचा अपमान; दोघांविरोधात गुन्हा दाखल
Published on

भिवंडी तालुक्यातील कवाड गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लावलेला श्रद्धांजली बॅनर अज्ञात समाजकंटकांनी फाडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या कृत्यामुळे सार्वजनिक भावना दुखावल्या असून सामाजिक सलोखा धोक्यात आल्याची भावना व्यक्त होत आहे. संतापाच्या पार्श्वभूमीवर भिवंडी तालुका पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

श्रद्धांजली बॅनर फाडून वैयक्तिक फोटो लावल्याचा आरोप

तक्रारीनुसार, भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायांनी कवाड नाका येथे श्रद्धांजली बॅनर लावला होता. मात्र, समाजकंटकांनी हा बॅनर जाणीवपूर्वक फाडून त्याजागी स्वतःचे वैयक्तिक फोटो असलेले बॅनर लावल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेने आंबेडकरी अनुयायांमध्ये तीव्र नाराजी उसळली.

आरपीआय सेक्युलर पदाधिकाऱ्यांनी तक्रार दाखल; आरोपींची नावे जाहीर

रोहित दास उर्फ बर्फी आणि अनिल खोपकर अशी आरोपींची नावे आहेत. तक्रारदार विजय भोईर, (रा. कवाड) आणि आरपीआय सेक्युलरचे तालुका अध्यक्ष यांनी आरोप केला की, संबंधित दोघांनी डॉ. आंबेडकरांचा अनादर करण्याच्या उद्देशाने बॅनर फाडून त्याचा वापर स्वतःच्या प्रसिद्धीसाठी केला.

"जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न" - आरपीआय सेक्युलरची प्रतिक्रिया

आरपीआय सेक्युलरचे ॲड. किरण चन्ने म्हणाले की, "हे कृत्य समाजात फूट पाडण्याच्या मानसिकतेतून करण्यात आले आहे. या प्रकरणात इतर काही जणांचीही नावे समोर आली आहेत. सर्व आरोपींना तात्काळ अटक न केल्यास लोकशाही मार्गाने जोरदार आंदोलन केले जाईल."

पोलिसांचा तपास आणि कारवाई

भिवंडी तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हर्षवर्धन बारवे यांनी सांगितले की, दोन्ही आरोपींवर गुन्हा नोंदवण्यात आला असून तपास सुरू आहे. 'कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल."

या घटनेमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीची आणि महापरिनिर्वाण दिनाच्या सामाजिक महत्त्वाची संवेदना पुन्हा एकदा समोर आली आहे. अनुयायांनी हे कृत्य निंदनीय असल्याचे म्हटले आहे, तर स्थानिक समाजकंटकांविरोधात योग्य ती कारवाई होणे अपेक्षित आहे.

logo
marathi.freepressjournal.in