

ठाणे : भिवंडीतील एका ढाब्यावर घडलेल्या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जेवणाच्या जास्त दरांबाबत विचारणा केल्यामुळे एका तरुणाला ढाब्याच्या मालकासह कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केल्याचे समोर आले आहे.
नाशिक महामार्गावरील भिवंडी-पडघा रोडवर असलेल्या ‘पंजाबी खालसा हॉटेल’ या ढाब्यावर हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. व्हायरल व्हिडिओतील व्यक्ती ट्रक चालक असून त्याचे नाव नरेंद्र तोमर असल्याचे समोर आले आहे.
नेमकं काय झालं?
नरेंद्र नाशिक महामार्गावर, समृद्धी महामार्गाजवळ असलेल्या या ढाब्यावर जेवणासाठी गेला होता. त्याने चार पोळ्या आणि हाफ प्लेट भाजी घेतली होती. मात्र त्यासाठी १८० रुपये आकारण्यात आले. हा दर जास्त असल्याचं म्हणत नरेंद्रने बिल काउंटरवर जाऊन मालकासमोरच व्हिडिओ बनवण्यास सुरूवात केली. व्हिडिओमध्ये नरेंद्र जास्त दरांबाबत तक्रार करत ते अवाजवी असल्याचे सांगत होता. मात्र, व्हिडिओ रेकॉर्ड करत असल्यामुळे मालकाचा राग अनावर झाला आणि त्याने अचानक उठून नरेंद्रला मारहाण करायला सुरूवात केली. हॉटेलचे अन्य कर्मचारीही नरेंद्रवर तुटून पडले. इतर लोकांच्या उपस्थितीतच नरेंद्रला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली, हात पिरगळण्यात आला, शिवाय त्याचा मोबाईल हिसकावण्याचाही प्रयत्न झाला.
सोशल मीडियावर संताप, पोलिसांनी घेतली दखल
हा व्हिडीओ 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर झोया खान नावाच्या युजरने शेअर केला. तिने पोस्टमध्ये संपूर्ण घटनेचा उल्लेख करत मुंबई पोलिसांना टॅग करत तात्काळ हस्तक्षेप करण्याची विनंती आणि कठोर कारवाईची मागणीही केली. तिचा हा व्हिडिओ व्हायरल होताच अनेकांनी अमानुष मारहाणीवर संताप व्यक्त केला असून, केवळ दरवाढीचा सवाल केल्यामुळे मारहाण कशी काय होऊ शकते, असा सवाल उपस्थित केला आहे. ढाबा मालक आणि कर्मचाऱ्यांना अटक करण्याची मागणीही जोर धरत आहे. दरम्यान, व्हायरल पोस्टला प्रतिसाद देत ठाणे शहर पोलिसांनी ऑनलाइन तक्रारीची दखल घेतली आहे. पोलिसांनी आपल्या उत्तरात ठाणे ग्रामीण पोलिसांना टॅग करत या प्रकरणावर आवश्यक कार्यवाही करण्यास सांगितले आहे. मात्र, या प्रकरणात एफआयआर दाखल झाली आहे की नाही किंवा कोणाला अटक करण्यात आली आहे का, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.