

काळ्या जादूचा प्रभाव दूर करण्याच्या नावाखाली पूजा-विधी आणि ज्योतिर्लिंग यात्रेचे आमिष दाखवत ठाण्यातील एका कुटुंबाची १ कोटी ६६ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार फेब्रुवारी २०२४ ते जानेवारी २०२६ या कालावधीत घडल्याचे समोर आले असून, याप्रकरणी मंजुनाथ शेट्टी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काळ्या जादूचा प्रभाव दूर करतो’ म्हणत पैसे उकळले
पीटीआयच्या वृत्तानुसार, जानेवारी २०२४ मध्ये एका कार्यक्रमात या कुटुंबाची आरोपी मंजुनाथ शेट्टी याच्याशी ओळख झाली. कुटुंब आर्थिक अडचणीत असल्याचे लक्षात येताच त्याने कुटुंबीयांना त्यांच्या नातेवाईकाने "काळी जादू" केली असून त्यामुळेच प्रगती अडथळ्यात येत असल्याचे सांगितले.
यावर उपाय म्हणून विविध पूजाविधी आणि १२ ज्योतिर्लिंगांच्या यात्रेचा सल्ला देत त्याने कुटुंबाला सतत पैसे देण्यास भाग पाडले. घरात घडणाऱ्या छोट्या-मोठ्या घटनांचा आधार घेत त्याने भीती निर्माण केली आणि पैसे उकळल्याचा आरोप आहे.
दोन वर्षांत कोट्यवधींची उकळपट्टी
फेब्रुवारी ते एप्रिल २०२४ दरम्यान पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याच्या नावाखाली कुटुंबाकडून सुमारे १० लाख रुपये रोख घेतल्याचे सांगितले जाते. त्यानंतर मे २०२४ ते जानेवारी २०२६ या काळात आरोपी आणि त्याच्या आईच्या खात्यावर ऑनलाइन व्यवहारातून सुमारे १.५६ कोटी रुपये जमा करण्यात आले.
तसेच, स्वतःवर सुरू असलेल्या न्यायालयीन प्रकरणांसाठी पैशांची गरज असल्याचे सांगून, “आपण तुरुंगात गेलो तर विधी अपूर्ण राहतील आणि परिस्थिती सुधारू शकणार नाही,” असे सांगत आणखी पैसे उकळल्याचा आरोप आहे.
गुन्हा दाखल, तपास सुरू
पीटीआयच्या माहितीनुसार, कासारवडवली पोलिसांनी २ एप्रिल रोजी या प्रकरणी आरोपी मंजुनाथ शेट्टी याच्याविरोधात एफआयआर नोंदवला आहे. कुटुंबाला “काळ्या जादूचा प्रभाव दूर करण्याच्या” नावाखाली दोन वर्षे पैसे देण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४) अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा तसेच महाराष्ट्र मानव बळी प्रतिबंध व इतर अमानुष, दुष्ट व अघोरी प्रथा आणि काळी जादू प्रतिबंधक कायदा, २०१३ अंतर्गत कलमे लावण्यात आली आहेत. दरम्यान, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून, पोलिस तपास सुरू आहे.