

ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयाबाहेर एका ज्येष्ठ नागरिकाला कथित परप्रांतीय कॅबचालकाने मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रस्त्यावर थुंकण्यास विरोध केल्याच्या कारणावरून हा वाद झाल्याचे सांगितले जात असून, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणातील विशेष बाब म्हणजे राजकीय मतभेद बाजूला ठेवत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत आरोपी कॅबचालकाचा शोध घेत त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.
रस्त्यावर थुंकण्यास विरोध केला अन्...
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी ज्युपिटर रुग्णालय परिसरात एक ज्येष्ठ दाम्पत्य फेरफटका मारत होते. त्यावेळी एका परप्रांतीय कॅबचालकाने रस्त्यावर थुंकला. हे पाहिल्यानंतर संबंधित ज्येष्ठ नागरिकांनी त्याला याबाबत जाब विचारला. मात्र, याच कारणावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला.
व्हिडिओ व्हायरल, संतापाची लाट
पाहता पाहता हा वाद विकोपाला गेला आणि त्या कॅबचालकाने ज्येष्ठ नागरिकाला त्यांच्या पत्नीसमोरच मारहाण करायला सुरूवात केली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आरोपी दगड उचलून वृद्ध व्यक्तीच्या दिशेने धाव घेत असल्याचेही दिसून येते. या मारहाणीत ज्येष्ठ नागरिक जखमी झाले असून त्यांच्या पायाला दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली. भररस्त्यात एका ज्येष्ठ नागरिकावर झालेल्या हल्ल्यामुळे आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येऊ लागली.
आरोपीच्या शोधासाठी ठाकरे-शिंदे गट एकत्र
घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते सुमित बोराटे आणि शिवसेना (शिंदे गट)चे नितेश पाटोळे यांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी पुढाकार घेतला. बोराटे यांच्या म्हणण्यानुसार, पाटोळे यांनी त्यांना हा व्हिडिओ पाठवल्यानंतर दोघांनी मिळून संबंधित कॅबचालकाची ओळख पटवली आणि त्याचा शोध सुरू केला.
आरोपीचा ठावठिकाणा मिळाल्यानंतर दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी त्याला पकडून वर्तकनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. या कारवाईची माहिती दोन्ही नेत्यांनी सोशल मीडियावरही शेअर केली आहे.
राजकारणापेक्षा न्याय महत्त्वाचा
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सुमित बोराटे यांनी सांगितले की, अन्यायाविरोधात उभे राहताना राजकीय मतभेदांना बाजूला ठेवणे आवश्यक आहे. एखाद्या ज्येष्ठ नागरिकावर भररस्त्यात हल्ला होत असेल तर त्याविरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले.
एकनाथ शिंदे यांचे कठोर कारवाईचे निर्देश
दरम्यान, या घटनेची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे पोलिसांना कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. रस्त्यावर घाण करू नका असे सांगितल्यामुळे एखाद्या व्यक्तीवर हल्ला होणे कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
शिंदे यांनी ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांना भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९ अंतर्गत खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली.
पोलिसांची भूमिका काय?
घटनेनंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात आला. त्यानंतर ठाणे शहर पोलिसांनीही या प्रकरणाची दखल घेतली. वर्तकनगर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना आवश्यक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे ठाणे पोलिसांनी सोशल मीडियावर स्पष्ट केले.
सध्या आरोपी कॅबचालक पोलिसांच्या ताब्यात असून या प्रकरणाचा पुढील तपास वर्तकनगर पोलीस करत आहेत.