

स्वीटी भागवत/मुंबई
ठाणेकरांचा प्रवास सुकर करणाऱ्या महत्वाकांक्षी १३.४५ किलोमीटर लांबीच्या ठाणे कोस्टल रोडच्या बांधकामाने वेग घेतला असून अवघ्या चौदा महिन्यांत या उन्नत मार्गाच्या पायाभरणीचे ७५ टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे.
या सहापदरी नियंत्रित मार्गिकेच्या उभारणीत अनेक टप्प्यांवर गर्डर लाँचिंगचे कामही सुरू झाले असून प्रकल्प एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. बाळकूम बाजूने बहुतांश भागांत पीअर कॅपचे काम पूर्ण झाल्याने आता वरील भागातील बांधकाम वेगाने पुढे सरकत असल्याची माहिती प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिली. नवयुगा इंजिनिअरिंग कंपनी लिमिटेडकडून या प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
खारेगाव नाका ते गायमुख दरम्यानचा हा संपूर्ण हरित मार्ग घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीला एक भक्कम पर्याय ठरणार आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर मुंबई-नाशिक महामार्ग आणि पश्चिम उपनगरांमधील कनेक्टिव्हिटी सुधारेल आणि ठाण्यातील वाहतूक कोंडीतून वाहनचालकांची सुटका होईल.
या प्रकल्पाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये देशात पहिल्यांदाच जमिनीवरील बांधकामासाठी सिंगल-पाइल, सिंगल-पीअर प्रणालीसह ‘मोनोपाइल फाउंडेशन’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यामुळे कमी जागेत वेगवान बांधकाम करणे शक्य झाले आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी खाडी किनाऱ्यावरील कांदळवनाचे नुकसान होणार नाही अशा पद्धतीने उन्नत मार्ग आणि पुलांची रचना करण्यात आली आहे.
गायमुख येथे हा किनारी रस्ता प्रस्तावित गायमुख-फाउंटन हॉटेल बोगद्याशी जोडला जाणार असल्याने भाईंदरच्या दिशेने थेट मार्ग उपलब्ध होईल. तसेच कासारवडवली-खारबाव, गायमुख-पायेगाव आणि कोलशेत-काल्हेर या प्रस्तावित खाडी पुलांशी हा रस्ता जोडला जाणार असून पुढे तो विरार-अलिबाग मल्टी-मोडल कॉरिडॉरला जोडला जाईल.
घोडबंदर रोडवरील ताण कमी होणार
या संपूर्ण जाळ्यामुळे घोडबंदर रस्त्यावरील ताण कमी होऊन जवाहरलाल नेहरू बंदर, प्रस्तावित वाढवण बंदर आणि दक्षिण महाराष्ट्र तसेच कर्नाटकच्या औद्योगिक केंद्रांकडे जाणारी मालवाहतूक सुलभ होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. हा मार्ग भविष्यातील ठाणे रिंग मेट्रो आणि साकेत-आमाने उन्नत मार्गाशी देखील जोडला जाणार आहे.