

ठाणे : एलआयसी पॉलिसीच्या कामाचे आमीष दाखवून अविवाहित शिक्षिकेला आसनगाव येथे बोलावले. तेथे तिच्याकडून मृत्युपत्र आणि अन्य कागदपत्रांवर जबरदस्तीने स्वाक्षऱ्या करून घेतल्यानंतर काही तासांतच नाक व तोंड दाबून तिची हत्या करण्यात आली. मालमत्ता हडप करण्यासाठी रचलेला हा थरारक कट ठाणे गुन्हे शाखेने उघडकीला आणत दोघांच्या मुसक्या आवळल्या आहे. तर फरार दोघांचा शोध सुरू असल्याची माहिती बुधवारी ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिली.
मोहने-आंबिवली येथील रहिवासी संगीता चंदनशिवे (५३) असे मृत शिक्षिकेचे नाव असून त्या चिंचपाडा येथील वेणूबाई पावशे शाळेत शिक्षिका तसेच एलआयसी एजंट म्हणून कार्यरत होत्या. १४ जुलैला एलआयसीच्या कामासाठी शहापूरला जात असल्याचे सांगून त्या घरातून बाहेर पडल्या. मात्र, त्या परत न आल्याने १५ जुलैला त्यांच्या भावाने कोळशेवाडी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील सिन्नर-घोटी मार्गावरील एसएमबीटी मेडिकल कॉलेजसमोरील रस्त्यालगत त्यांचा मृतदेह आढळला.
पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह रस्त्यालगत टाकला
शिक्षिकेला त्यांनी आसनगाव येथील फ्लॅटमध्ये नेऊन स्वतःला वारसदार दर्शवणारे मृत्युपत्र तयार केले. त्यावर तसेच मालमत्तेच्या कागदपत्रांवर जबरदस्तीने स्वाक्षऱ्या घेतल्यानंतर तिचा नाक व तोंड दाबून खून केला. त्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह कारमधून नाशिक रस्त्यालगत टाकून दिला.
दोन आरोपी अजूनही मोकाट
अवघ्या काही दिवसांत या गुन्ह्याचा छडा लावत ठाणे गुन्हे शाखेन दोघांना अटक केली असून त्यांना पुढील तपासासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे तर, या कटातील अन्य फरार दोघांचा शोध सुरू आहे.
सीसीटीव्ही, तांत्रिक विश्लेषणाने काढला माग
ठाणे गुन्हे शाखेच्या कल्याण घटक-३ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने समांतर तपास सुरू केला. यावेळी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे आसनगाव येथील दिगंबर आव्हाड (४८) आणि कल्याण,आंबिवली येथील तुषार रत्नपारखी (५२) यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आव्हाड आणि रत्नपारखी या दोघांनी नाशिक येथील संतोष जाधव आणि आंबिवली येथील विनोदचंद्र उर्फ संतोष पांडे या दोन साथीदारांच्या मदतीने हा कट रचल्याची कबुली दिली.