

ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवासस्थान असलेल्या ठाण्यातील प्रभाग क्रमांक १३ मध्येच सत्ताधाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. ठाण्याचे माजी महापौर अशोक वैती यांच्यावर पराभवाची नामुष्की ओढवली असून, या प्रभागात शिवसेना (ठाकरे गट) ची ‘मशाल’ पेटली आहे.
प्रभाग क्रमांक १३ मध्ये शिवसेना (ठाकरे गट) चे उमेदवार शहाजी खुस्पे यांनी शिवसेना (शिंदे गट) चे माजी महापौर अशोक वैती यांचा पराभव केला. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्र्यांच्या प्रभागातच ठाकरे गटाने आक्रमक आव्हान उभे केले होते आणि त्यात त्यांना यश मिळाले. या प्रभागातून ठाकरे गटाचा पहिला उमेदवार विजयी ठरल्याने शिंदे गटाला हा पराभव चांगलाच जिव्हारी लागणारा मानला जात आहे.
माजी महापौर अशोक वैती यांचा पराभव
या निवडणुकीत माजी महापौर अशोक वैती यांचा ६२४ मतांनी पराभव झाला. त्यामुळे शिंदे गटासाठी हा धक्का मानला जात आहे. पॅनल ‘ड’ मध्ये शिंदे गटाचे उमेदवार अनिल भोर यांना ११ हजार ७४९ मते मिळाली, तर ठाकरे गटाचे संजय दळवी यांना ११ हजार ५०३ मते मिळाली. अवघ्या २४६ मतांच्या फरकाने भोर यांना विजय मिळवता आला. प्रभाग ‘क’ मध्येही शिंदे गटाच्या उमेदवारांना मोठी झुंज द्यावी लागली. अखेर या प्रभागातील तीन पॅनलमध्ये शिंदे गटाच्या उमेदवारांनी विजय मिळवला असला, तरी माजी महापौर अशोक वैती यांचा पराभव शिंदे गटासाठी राजकीयदृष्ट्या मोठा धक्का मानला जात आहे. या निकालाने ठाण्यातील राजकारणात एक संदेश दिला असून, बंडखोरीपेक्षा पक्षीय निर्णय आणि संघटनात्मक ताकदीलाच मतदारांनी अधिक महत्त्व दिले असल्याचे दिसून आले आहे.
अ - खुस्पे शहाजी संपत (उबाठा ) - १२८६०
ब - निर्मला शरद कणसे (शिवसेना ) - १४९७६
क - वर्षा संदिप शेलार शिवसेना - १२४११
ड - अनिल चिंतामण भोर शिवसेना - ११७४९