लोकलच्या गर्दीतून दिलासा,१२ वीच्या विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर जाग! KDMC-TMCचा निर्णय, ठाणे-डोंबिवली-कल्याण बससेवा होणार सुरु

मुंबईच्या उपनगरीय रेल्वे मार्गांवरील वाढती गर्दी आणि सलग घडलेल्या दोन दुर्दैवी मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (केडीएमसी) आणि ठाणे महानगरपालिका (टीएमसी) यांनी ठाणे-डोंबिवली-कल्याणदरम्यान बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकलच्या गर्दीतून दिलासा,१२ वीच्या विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर जाग! KDMC-TMCचा निर्णय, ठाणे-डोंबिवली-कल्याण बससेवा होणार सुरु
Published on

मुंबईच्या उपनगरीय रेल्वे मार्गांवरील वाढती गर्दी आणि सलग घडलेल्या दोन दुर्दैवी मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) आणि ठाणे महानगरपालिका (TMC) यांनी ठाणे-डोंबिवली-कल्याणदरम्यान बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक गाड्यांवरील ताण कमी करणे आणि प्रवाशांना अधिक सुरक्षित, पर्यायी प्रवास सुविधा उपलब्ध करून देणे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दोन मृत्यूंनंतर प्रशासन सतर्क

माहितीनुसार, ११ फेब्रुवारी रोजी बारावीचा विद्यार्थी सोहम कटरे (वय १८) हा मुंब्रा-कळवा स्थानकांदरम्यान गर्दीने भरलेल्या कल्याण-सीएसएमटी मार्गावरील लोकलमधून खाली पडला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. परीक्षेला जात असताना घडलेल्या या घटनेने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याआधी ३१ जानेवारी रोजी बदलापूर स्थानकावर सकाळच्या गर्दीत लोकलमध्ये चढताना चेतना देवरुखकर (वय २८) यांचाही रेल्वे रुळावर पडून जागीच त्यांचा मृत्यू झाला.

लोकलच्या गर्दीतून दिलासा,१२ वीच्या विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर जाग! KDMC-TMCचा निर्णय, ठाणे-डोंबिवली-कल्याण बससेवा होणार सुरु
डोंबिवली : गर्दीमुळे पुन्हा एक बळी; परीक्षेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्याचा धावत्या लोकलमधून पडून मृत्यू

या दोन्ही घटनांमुळे विशेषतः ठाणे-डोंबिवली दरम्यानच्या मार्गावरील कायमस्वरूपी गर्दीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

गर्दीच्या वेळांमध्ये बसच्या फेऱ्या

'हिंदुस्तान टाइम्स'च्या वृत्तानुसार, केडीएमसीकडून सुरुवातीला ४० आसनी दोन बस सुरू केल्या जाणार आहेत. या बसच्या गर्दीच्या वेळेत (Peak hours) प्रत्येकी चार फेऱ्या चालवण्यात येतील. तर टीएमसीला केंद्र सरकारच्या पीएम ई-बस सेवा योजनेअंतर्गत ३०३ इलेक्ट्रिक बस मिळणार आहेत. त्यापैकी काही बस ठाणे-डोंबिवली मार्गावर धावणार आहेत.

डोंबिवलीचे भाजप नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी डोंबिवली-ठाणे दरम्यान तातडीने बससेवा सुरू करण्याची मागणी केल्यानंतर या हालचालींना वेग आला. त्यानंतर दोन्ही महापालिकांनी माणकोली-मोठागाव पुलामार्गे बससेवा सुरू करण्याचे नियोजन केले.

मार्चच्या पहिल्या आठवड्यात प्रारंभ

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मार्चच्या पहिल्या आठवड्यात ही सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. ठाण्यातील घोडबंदर रोडवरील माजीवडा ते डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव असा हा मार्ग असेल. माणकोली-मोठागाव पूल सुरू झाल्यामुळे प्रवासाचे अंतर १० किमीहून अधिक कमी झाले असून हा मार्ग थेट मुंबई-नाशिक महामार्गाला जोडतो.

यापूर्वी भिवंडी बायपास किंवा शिळफाटा-मुंब्रा मार्गे प्रस्तावित मार्ग वाहतूक कोंडीमुळे वेळखाऊ ठरत असल्याने रद्द करण्यात आले होते. तसेच खारेगाव पुलाच्या सुरूवातीमुळेही वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

रेल्वेवरील ताण कमी करण्याचा प्रयत्न

डोंबिवलीहून मोठ्या प्रमाणावर प्रवासी दररोज ठाण्यातील वागळे इस्टेट आणि घोडबंदर रोड परिसरातील व्यावसायिक भागात ये-जा करतात. प्रस्तावित बससेवेच्या माध्यमातून गर्दीच्या वेळेत लोकलवरील ताण कमी होऊन प्रवाशांना सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाचा पर्याय उपलब्ध होईल, असा प्रशासनाचा विश्वास आहे.

logo
marathi.freepressjournal.in