
‘ऑपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर भारतात राहून पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्यांची शोधमोहीम तपास यंत्रणेद्वारे सुरू आहे. याच मालिकेत, हरियाणातील युट्यूबर ज्योती मल्होत्रासह काही जणांना अटक केल्यानंतर, आता महाराष्ट्रातही एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यातील कळवा परिसरातून एका २७ वर्षीय अभियंत्यास अटक करण्यात आली असून त्याच्यावर नौदलाच्या युद्धनौका आणि पाणबुड्यांबाबत संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवण्याचा गंभीर आरोप आहे.
डॉकयार्डमध्ये प्रवेश असलेला अभियंता हनीट्रॅपमध्ये अडकला
महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाने (ATS) अटक केलेल्या तरुणाचे नाव रवींद्र मुरलीधर वर्मा असे असून तो ठाण्यातील कळवा परिसरात राहतो. वर्मा संरक्षण तंत्रज्ञानाशी संबंधित प्रकल्पांवर काम करणाऱ्या एका खाजगी कंपनीत कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत होता. या कंपनीच्या माध्यमातून त्याला दक्षिण मुंबईतील नौदल डॉकयार्डमध्ये नियमितपणे प्रवेश मिळत असे. त्यामुळे तो नौदलाच्या जहाजांवर प्रत्यक्ष काम करत होता आणि त्यादरम्यान त्याला संवेदनशील तांत्रिक माहिती मिळत होती.
फेसबुकवरून पाकिस्तानी महिला एजंटशी संपर्क
ATS ने दिलेल्या महितीनुसार, फेसबुकवर 'पायल शर्मा' आणि 'इस्प्रित' या नावाने स्वतःची ओळख सांगणाऱ्या पाकिस्तानी महिला एजंटशी वर्माची ओळख झाली होती. काही काळातच तिच्यासोबत त्याचे मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले. मात्र ही महिला प्रत्यक्षात पाकिस्तानी गुप्तचर संस्थेशी संबंधित एजंट असल्याचे पुढे आले. या हनीट्रॅपमध्ये अडकून वर्माने नोव्हेंबर २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत तिच्यासोबत संवाद साधला.
या संवादात, एजंटने वर्माकडे युद्धनौका आणि पाणबुड्यांबाबत माहिती मागितली. डॉकयार्डमध्ये मोबाईल नेण्यास बंदी असल्यामुळे वर्मा तांत्रिक माहिती लक्षात ठेवून, नंतर ती व्हॉट्सअॅपद्वारे मजकूर आणि व्हॉइस नोट्सच्या स्वरूपात पाठवत असे. त्याने एकूण १४ युद्धनौकांबाबत संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवली, असा दावा तपास यंत्रणांनी केला आहे.
एटीएसची कारवाई, कायदेशीर प्रक्रिया सुरू
गुप्तचर संस्थांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, महाराष्ट्र ATS ने ही कारवाई केली. वर्मासोबत संपर्कात असलेल्या आणखी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले होते, मात्र चौकशीनंतर त्यांना सोडण्यात आले. रवींद्र वर्मावर अधिकृत गोपनीयता कायदा १९२३ च्या कलम ३(१)(ब) आणि ५(अ), तसेच भारतीय दंड संहिता २०२३ च्या कलम ६१(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असून, पुढील तपासासाठी ATS कोठडीत ठेवण्यात आले आहे. एटीएस त्याच्या मोबाईल फोन आणि इतर उपकरणांची तपासणी करत आहे, तर या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का, याचा शोध घेण्याचे कामही सुरू आहे.