

ठाण्यातील अत्यंत वर्दळीच्या घोडबंदर रोडवरील गायमुख घाटाच्या उतरणीवर शुक्रवारी (दि.९) सकाळी एका कंटेनरमुळे ११ वाहनांचा विचित्र अपघात झाला. त्यामुळे येथे ऐन सकाळच्या गर्दीच्या वेळेतच प्रचंड वाहतूककोंडी झाली होती. अपघातानंतर कंटेनरचा चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. ठाण्याच्या दिशेने सिमेंट वाहतूक (३५ ते ४० टन सिमेंटच्या गोण्या) करणाऱ्या कंटेनर चालकाचे घाटाच्या उतारावर नियंत्रण सुटले. त्याने समोरून येणाऱ्या (बोरिवलीकडे) अनेक वाहनांना जोरदार धडक दिली. यात एका रिक्षाचाही समावेश आहे. काही वाहनांच्या पुढच्या व मागच्या भागाचा अक्षरशः चुराडा झाला. अपघातग्रस्त वाहनांमधून रस्त्यावरच ऑईल सांडल्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली होती. शिवाय, रस्त्यावरच गाड्यांच्या काचा व काही पार्ट्स तुटून पडले. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, चार जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी ओवळा येथील टायटन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, किरकोळ जखमी झालेल्या काहीजणांनी स्वतःच खासगी रुग्णालयात उपचार घेतल्याचे समजते.
दोन तास प्रचंड कोंडी, नागरिकांचे हाल
अपघातामुळे ठाणे–घोडबंदर रोडवरील दोन्ही दिशेने सुमारे दोन तास मोठी वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले. सध्या अपघातग्रस्त वाहने बाजूला हटवण्यात आली असून वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे. दरम्यान, अपघातानंतर चालक फरार झाला असून कासारवडवली पोलिस त्याचा शोध घेत आहेत.