
मुसळधार पावसाने मुंबई आणि ठाण्यात सोमवारी (दि. १८) सकाळपासूनच जनजीवन विस्कळीत केले आहे. रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीची कोंडी, लोकल ट्रेनच्या गाड्यांचा वेग कमी, अशा अडचणींनी नागरिक त्रस्त झाले. ठाण्यात अवघ्या काही तासांत विक्रमी पावसाची नोंद झाल्याने ठाणे महापालिका प्रशासनाने सर्व शाळांना मंगळवारी (१९ ऑगस्ट) सुट्टी जाहीर केली आहे. नवी मुंबईतही शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
ठाण्यात अतिवृष्टीची नोंद
ठाण्यात फक्त ४ तासांत ३१.२२ मिमी पाऊस झाला. यापैकी सकाळी ११ ते १२.३० दरम्यान सर्वाधिक म्हणजे १६.२६ मिमी पाऊस पडला. पुढील ४८ तासांत अतिवृष्टीचा इशारा असल्याने महापालिकेने तातडीने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
महापालिकेने स्पष्ट केले आहे की, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन आज दुपारी शाळेत आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक व शिक्षकांनी सुरक्षितपणे घरी पोहोचवण्याची जबाबदारी घ्यावी. दरम्यान, दोन दिवसांतील सर्व परीक्षा व कार्यक्रम पुढे ढकलण्यात यावेत, असे आदेश देण्यात आले आहेत.
मुंबईत १७० मिमी पाऊस
मुंबईत मागील सहा तासांत १७० मिमी पाऊस झाला असून, चेंबूर परिसरात सर्वाधिक १७७ मिमी पावसाची नोंद झाली. पावसामुळे लोकल ट्रेनचा वेग मंदावला, मात्र सेवा बंद झालेली नाही. संध्याकाळी उच्च भरतीचा इशारा असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.
भारतीय हवामान विभागाने मुंबई-ठाण्यासाठी मुसळधार पावसाचा इशारा कायम ठेवला असून, नागरिकांना अत्यावश्यक कारणांशिवाय बाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे.