

ठाणे : ठाण्यात काहींनी ज्योतिष्यांकडून वेळ घेऊन उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सोमवारचा मुहूर्त काढला होता. परंतु महायुतीचे जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्यापही अंतिम न झाल्याने ज्यांनी अर्ज भरण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी केली होती, त्यांना पक्षाकडून ‘थांबा’ असा इशारा देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. जो पर्यंत युतीचे ठरत नाही, तो पर्यंत अर्ज भरू नका, असा सल्ला दोन्ही पक्षातील माजी नगरसेवकांना देण्यात आला.
ठाणे महापालिकेच्या निवडणुका येत्या १५ जानेवारी रोजी होणार आहेत. त्यानुसार ठाण्यातही महायुतीच्या माध्यमातून निवडणुका लढविल्या जातील, असे दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी स्पष्ट केले. त्यानुसार ठाण्यात भाजप आणि शिंदे सेनेच्या चार बैठका झाल्या. परंतु या बैठका झाल्यानंतर जागावाटपाचे गणित अंतिम होऊ शकलेले नाही.
त्यात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एक दिवस शिल्लक असतानाही आता काय करायचे असा पेच इच्छुकांना सतावू लागला आहे. काहींनी एबी फॉर्म मिळाले आहेत, तर काहींना अद्यापही त्याची अपेक्षा आहे. तरीही अनेकांनी सोमवारचा मुहूर्त साधत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी सुरू केली होती.
त्यानुसार रविवारीच सोशल मीडियाच्या माध्यमातून शिंदे सेनेतील भोईर फॅमिलीने अर्ज भरण्यासाठी कार्यकर्त्यांना आवाहन केले होते. त्यानुसार सोमवारी त्यांच्या कुटुंबातील देवराम भोईर, संजय भोईर, उषा भोईर आणि भुषण भोईर हे अर्ज भरणार होते. त्यानुसार सकाळी ९.३० ची वेळ अंतिम करण्यात आली. सोमवारी सकाळी कार्यकर्त्यांची जमवाजमव झाली, गाड्यांचा ताफा आला. परंतु अचानक अर्ज भरण्यातून त्यांनी माघार घेतली. पक्षाकडून त्यांना ‘थांबा’ असा सल्ला देण्यात आला.
दुसरीकडे पाचपाखाडी भागात भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार यांनी ढोल ताशा वाजवत अर्ज भरण्याची तयारी केली होती. त्यानुसार बाजूला असलेल्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन अर्ज भरण्याची तयारी त्यांनी केली होती. परंतु त्यांना देखील ‘थांबा’ अशा सूचना आल्याने आलेल्या कार्यकर्त्यांना माघारी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या.
पक्षाकडून थांबण्याची सूचना देण्यात आली. तसेच ‘एबी’ फॉर्मही दिला नाही, महायुतीची बोलणी सुरू असल्याने ती पूर्ण झाल्यावर मंगळवारी अर्ज भरला जाणार आहे.
संजय भोईर - माजी नगरसेवक, शिंदे सेना
युतीची बोलणी सुरू आहेत, तसेच पॅनलमध्ये कोण कोण उमेदवार असणार याचे चित्रही स्पष्ट झाले नव्हते. त्यामुळे एकत्रितच अर्ज भरण्याचे नियोजन करण्यात आल्याने अर्ज भरला नाही.
नारायण पवार - माजी नगरसेवक, भाजप