
ठाणेकरांच्या जलद वाहतूक सुविधेतला पहिला टप्पा पार पडला आहे. कॅडबरी जंक्शन ते कासारवडवली या सुमारे १० किलोमीटरच्या मार्गावर मेट्रो लाईन ४ ची पहिली चाचणी सोमवारी (दि. २२) यशस्वीरीत्या पार पडली.
या ट्रायल रनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे वाहतूक मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित होते. त्यांनी प्रत्यक्ष मेट्रो कोचची पाहणी केली, तांत्रिक तपासणी केली आणि संपूर्ण प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, हा मार्ग ठाणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. मेट्रो लाईन ४ ची एकूण लांबी ३५ किलोमीटर असून, त्यात ३२ किलोमीटर मेट्रो लाईन ४ आणि २.८८ किलोमीटर मेट्रो लाईन ४A समाविष्ट आहे. ३५ किमी लांबीचा हा कॉरिडॉर ठाणे शहराला मुंबईच्या पूर्व व पश्चिम उपनगरांशी जोडणार आहे. या प्रकल्पावर सुमारे १६,००० कोटी रुपये खर्च होणार असून, या मार्गावर अखेरीस ८ डब्यांच्या गाड्या धावतील. प्रकल्प पूर्ण झाल्यावर प्रवासाचा वेळ ५० ते ७५ टक्क्यांनी कमी होईल आणि दररोज २१ लाखांहून अधिक प्रवासी या सुविधेचा लाभ घेतील, अशी अपेक्षा आहे.
मोघरपाडा येथे मेट्रोसाठी डेपोची जमीन मिळवणे हे मोठे आव्हान होते. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वैयक्तिक प्रयत्नांमुळे अडचणी दूर झाल्या, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. मोघरपाडा येथे डेपोसाठी ४५ हेक्टर जागा उपलब्ध केली गेली असल्याची माहिती त्यांनी दिली. ज्यामुळे मेट्रो ४, ४A, १० आणि ११ या सर्व मेट्रो मार्गांसाठी एक मोठा डेपो निर्माण होणार आहे.
ठाणे मेट्रोची वैशिष्ट्ये :
BEML चे 6-डब्यांचे ट्रेन-सेट्स : या ट्रेन-सेट्स मेट्रो मार्ग 2A आणि 7 वर चालत असलेल्या ट्रेनच्या पद्धतीनुसार आहेत.
आधुनिक ट्रेन कंट्रोल अँड मॅनेजमेंट सिस्टम : यामुळे ट्रेन्सचे नियंत्रण अधिक सुरक्षित आणि प्रभावी बनते, तसेच ट्रॅफिक व्यवस्थापनात सुधारणा होईल.
प्रवासी आपत्कालीन संपर्क यंत्रणा : प्रवाशांसाठी आपत्कालीन परिस्थितीत त्वरित संपर्क साधता येईल.
स्वयंचलित अग्निशमन शोध प्रणाली : आग लागल्यास त्वरित यंत्रणा सक्रिय होईल, ज्यामुळे सुरक्षेची खात्री वाढेल.
अडथळा शोध उपकरण (Obstacle Detection) : मेट्रो मार्गावर कोणत्याही अडथळ्यांचा शोध घेण्यासाठी अत्याधुनिक उपकरणे वापरण्यात येतील.
आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्यासाठी दरवाजा : आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर पडण्यासाठी विशेष दरवाजे.
ऑन-बोर्ड सार्वजनिक उद्घोषणा व माहिती प्रणाली : प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी व माहिती देण्यासाठी ऑन-बोर्ड उद्घोषणा आणि माहिती प्रणाली उपलब्ध.
ऊर्जा बचत करणारी पुनरुत्पादक ब्रेकिंग प्रणाली : ब्रेकिंग करतांना उर्जा वाचवण्यासाठी सुमारे ३०% ऊर्जा बचत होईल.
ट्रायल रनमधील १० स्थानके :
कॅडबरी
माजीवाडा
कपूरबावडी
मानपाडा
टिकुजी-नी-वाडी
डोंगरी पाडा
विजय गार्डन
कासरवाडवली
गोवानिवाडा
गायमुख
देशातील सर्वात लांब एलिव्हेटेड मेट्रो मार्ग
मेट्रो लाईन ४ (वडाळा-कासारवडवली) आणि ४A (कासारवडवली-गायमुख) मिळून प्रकल्पाची लांबी ५८ किलोमीटरपेक्षा अधिक असेल. यामुळे हा देशातील सर्वात लांब एलिव्हेटेड मेट्रो मार्गांपैकी एक ठरणार आहे. अधिकाऱ्यांच्या मते, या प्रकल्पामुळे प्रवास सुरक्षित, विश्वासार्ह आणि पर्यावरणपूरक होईल. विद्यार्थी, नोकरीसाठी प्रवास करणारे तसेच दैनंदिन प्रवाशांच्या गतिशीलतेत मोठी सुधारणा होणार आहे.
रस्ते वाहतुकीवरील ताण कमी होऊन ही मेट्रो विद्यमान उपनगरी रेल्वे व्यवस्थेला पूरक ठरेल. त्यामुळे ठाणेकरांचा मुंबई, नवी मुंबई, वडाळा, भांडुप आणि घोडबंदरकडे होणारा प्रवास अधिक सोयीस्कर आणि वेगवान होणार आहे.
पहिल्या चाचणीचे यश मिळाल्यानंतर, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) डिसेंबर २०२५ पर्यंत प्रकल्पाचा पहिला टप्पा प्रवाशांसाठी खुला करण्याच्या तयारीत आहे.