ठाणे : ठाणे महानगरपालिका ने आर्थिक वर्षअखेर महसूल वसुलीत उल्लेखनीय कामगिरी करत १,९०० कोटींचे उद्दिष्ट ओलांडले आहे. विविध कर व शुल्कांच्या माध्यमातून एकूण १,९०९ कोटी रुपयांचा महसूल जमा करत पालिकेने आर्थिक शिस्तीचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे.
या महसुलात मालमत्ता कराचा सर्वाधिक वाटा असून, तब्बल ८७८ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे. शहर विकास विभागाने ६६२ कोटी रुपयांची कमाई करत दुसरे स्थान मिळवले आहे. याशिवाय पाणीपुरवठा विभागाकडून १४० कोटी, अग्निशमन विभागाकडून ७८ कोटी, जाहिरात विभागातून ३६ कोटी, स्थावर मालमत्ता विभागातून १७ कोटी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून १५ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.
कर वसुलीसाठी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमा, थकबाकीदारांवर केलेली कारवाई आणि काटेकोर अंमलबजावणीमुळे ही यशस्वी कामगिरी साध्य झाल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. विशेषतः
मालमत्ता कर वसुलीत मोठी वाढ झाली असून, मागील वर्षांच्या तुलनेत लक्षणीय प्रगती दिसून आली आहे. मात्र, पाणीपुरवठा विभागाला २५० कोटींचे उद्दिष्ट गाठता आले नसल्याने महसूल वाढीची काहीशी संधी गमावली गेली.
महापालिकेचे आवाहन
करदात्यांना propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावरून देयके पाहता येतील तसेच ऑनलाइन पद्धतीने कर भरता येईल. Google Pay, PhonePe, BHIM, Paytm आणि WhatsApp चॅटबॉटद्वारेही कर भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.
सवलतींचे वेळापत्रक
१५ जूनपर्यंत : १०% सूट
१६ ते ३० जून २०२६ : ४% सूट
१ ते ३१ जुलै २०२६ : ३% सूट
१ ते ३१ ऑगस्ट
२०२६ : २% सूट