

ठाणे : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिका ने यंदा नालेसफाई मोहीम वेळेआधी सुरू केली असून, कामाची सुरुवात मुंब्रा परिसरातून करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यंदा प्रथमच मोठ्या प्रमाणावर रोबोटिक आणि यांत्रिक पद्धतींचा वापर करून नालेसफाई केली जात आहे.
मात्र, प्रत्यक्ष कामादरम्यान नाल्यांमध्ये टाकण्यात आलेल्या विद्युत व इतर सेवा वाहिन्यांमुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी या वाहिन्या गुंतागुंतीच्या व लटकलेल्या अवस्थेत आढळत असून, सफाईदरम्यान यंत्रसामग्रीच्या धक्क्याने त्या तुटण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत जीवितहानीचा गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने संबंधित विभागांना तातडीने वाहिन्या हटवून योग्य नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण न झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
नाल्यांमधून काढण्यात येणारा गाळ शास्त्रोक्त पद्धतीने हाताळून योग्य ठिकाणी स्थलांतरित केला जात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मोठ्या नाल्यांसाठी यांत्रिक व रोबोटिक साधनांचा वापर केला जात असताना, अरुंद व दुर्गम ठिकाणी मनुष्यबळाच्या मदतीने सफाई सुरू आहे.
दरम्यान, कापुरबावडी परिसरात नाला कलव्हर्ट साफ करताना मोठ्या प्रमाणावर विद्युत व इतर वाहिन्या अस्ताव्यस्त अवस्थेत आढळून आल्या. यामुळे कामात अडथळे निर्माण होत असून अपघाताचा धोका वाढला आहे. संबंधित विभागांशी पत्रव्यवहार करून या वाहिन्या तातडीने हटवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
नालेसफाईदरम्यान आढळणाऱ्या विद्युत व इतर वाहिन्यांमुळे गंभीर धोका निर्माण झाला आहे. संबंधित विभागांनी पावसाळ्यापूर्वी त्या हटवाव्यात, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल.
मधुकर बोडके, उपायुक्त (घनकचरा)
१८६ किलोमीटर नाल्यांच्या सफाईवर विशेष भर
दरवर्षी नाले वेळेत साफ न झाल्याने पाणी तुंबणे, पूरस्थिती निर्माण होणे आणि अपघात घडण्याच्या घटना समोर येतात. याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी यंदा व्यापक नियोजन करण्यात आले आहे. सन २०२५-२६ साठी पालिका क्षेत्रातील ९ प्रभाग समित्यांअंतर्गत मुख्य व उपनाल्यांसह एकूण ३८४.९१ किलोमीटर लांबीच्या नाल्यांची सफाई करण्यात येणार आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण करून १० एप्रिलपासून प्रत्यक्ष कामांना सुरुवात झाली आहे. शहरातील सुमारे १८६ किलोमीटर नाल्यांच्या सफाईवर विशेष भर देण्यात आला असून, कामाचा वेग वाढवण्यासाठी सात ठेकेदारांची नियुक्ती करण्यात आली आहे.