

ठाणे : रस्ते आणि पदपथांच्या काँक्रीटीकरणात झाडांच्या खोडांभोवतीही काँक्रीट टाकल्याने झाडांच्या वाढीला अडथळा निर्माण होत आहे. मुळांना हवा, पाणी आणि पोषकद्रव्ये मिळण्यात अडचणी येत असल्याने ठाणे महापालिकेने शहरातील ६ हजार १९२ झाडांच्या खोडांभोवतीचे काँक्रीट हटविण्याचा निर्णय प्रस्तावित केला आहे.
माजिवडा-मानपाडा, वागळे, नौपाडा-कोपरी, उथळसर, लोकमान्यनगर - सावरकरनगर, वर्तकनगर, कळवा, मुंब्रा आणि दिवा या नऊ प्रभाग समित्यांमध्ये हे काम केले जाणार आहे. त्यासाठी जीएसटी आणि विम्यासह ४४ लाख ७३ हजार २७ रुपयांचा खर्च अपेक्षित असून, या कामासाठी नऊ स्वतंत्र निविदा काढण्याचा प्रस्ताव प्रशासनाने सादर केला आहे.
झाडांच्या खोडाभोवती काँक्रीटीकरण केल्याने पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास अडथळा निर्माण होतो. तसेच मुळांना आवश्यक हवा आणि ओलावा मिळत नसल्याने झाडांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. या पार्श्वभूमीवर न्यायालय आणि राष्ट्रीय हरित लवादाने झाडांच्या संरक्षणासाठी खोडाभोवतीची काँक्रीटची बांधकामे हटविण्याबाबत निर्देश दिले आहेत. ठाणे शहरात विविध रस्ते आणि पदपथांच्या कामांदरम्यान झाडांच्या खोडांभोवती काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. कालांतराने झाडांची वाढ झाल्याने हे काँक्रीट त्यांच्या नैसर्गिक वाढीला अडथळा ठरत आहे. त्यामुळे काँक्रीट हटवून त्या ठिकाणी मोकळी आणि पाणी जमिनीत झिरपेल अशी जागा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
मात्र, या लेखाशीर्षाखाली अर्थसंकल्पीय तरतूद उपलब्ध नसल्याने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ७२ (ब) अन्वये दायित्व स्वीकारण्याची मान्यता मागण्यात आली.
माजिवडा-मानपाड्यात सर्वाधिक झाडे
प्रभाग समितीनिहाय प्रस्तावित कामांमध्ये माजिवडा-मानपाडा येथे ९१०, वागळे येथे ५१२, नौपाडा-कोपरी येथे ६००, उथळसर येथे १ हजार ६, लोकमान्यनगर-सावरकरनगर येथे ५४०, वर्तकनगर येथे ७०१, कळवा येथे ९३९, मुंब्रा येथे ६०९ आणि दिवा येथे ३७५ झाडांच्या खोडांभोवतीचे काँक्रीट हटविण्यात येणार आहे. यामध्ये उथळसर प्रभाग समितीतील झाडांची संख्या सर्वाधिक आहे. या संपूर्ण कामाचा अंदाजित खर्च जीएसटी आणि विम्यासह ४४.७३ लाख रुपये आहे. हा खर्च महापालिकेच्या ‘रस्ते दुरुस्ती’ या लेखाशीर्षाखाली प्रस्तावित करण्यात आला आहे.