

सध्या राज्यात निवडणुकांची धामधूम सुरु असून ठाण्याच्या राजकीय विश्वात खळबळ उडाली आहे. ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी गुरुवारी (दि.२५) शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडी प्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे.
विक्रांत वायचळ यांची शिवसेना शिंदे गटातून हकालपट्टी
शिवसेना शिंदे गटाकडून ठाणे महापालिका प्रभाग क्रमांक ३ मधील शाखाप्रमुख विक्रांत वायचळ यांची पक्षविरोधी कारवाईच्या आरोपाखाली शिवसेनेतून आज हकालपट्टी करण्यात आली. या कारवाईमुळे मीनाक्षी शिंदे नाराज झाल्या. म्हणून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.
या पदावर काम करण्यास असमर्थ...
"वैयक्तिक कारणास्तव आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार करून मी या पदावर काम करण्यास असमर्थ असून मी माझ्या पदाचा त्याग करत आहे असे त्यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे.
विक्रांत वायचळ हे मीनाक्षी शिंदे यांचे निकटवर्तीय
राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांनुसार, विक्रांत वायचळ हे मीनाक्षी शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे त्यांच्या हकालपट्टीनंतर मीनाक्षी शिंदे यांनी पक्षातील आपली जबाबदारी सोडण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
जागावाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये मतभेद
दरम्यान, ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गट स्वबळावर निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी करत असल्याचीही चर्चा जोर धरत आहे. सध्या भाजपसोबत युतीसंदर्भात चर्चा सुरू असल्या तरी जागावाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये मतभेद असल्याने शिंदे गट स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत.
१५ जानेवारीला मतदान तर १६ जानेवारीला निकाल
राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असून ठाणे महापालिका निवडणुकीसह राज्यातील सर्व महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. तर, १६ जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे.