रस्त्यांवरील खड्डे, उघडे मॅनहोल आणि रस्ते देखभालीतील त्रुटींमुळे मृत्यू किंवा अपघात झालेल्या नागरिकांना नुकसानभरपाई देण्यासाठी ठाणे महापालिका क्षेत्रात विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने १३ ऑक्टोबर २०२५ रोजी दिलेल्या निर्देशांनुसार ही समिती गठीत करण्यात आली असून, तिची पहिली बैठक मंगळवारी (१६ डिसेंबर) ठाणे महापालिकेत पार पडली.
या समितीचे अध्यक्ष म्हणून ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव तर सदस्य म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव रवीकांत पाझरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएमआरडीए, ठाणे महापालिका, वाहतूक पोलीस, विविध पोलीस ठाण्यांचे अधिकारी तसेच कायदेविषयक सल्लागार उपस्थित होते.
नागरिकाचा मृत्यू झाला तर...
बैठकीत ठरवण्यात आले की, ठाणे शहरात रस्त्यावरील खड्डे, उघडे मॅनहोल किंवा रस्त्यांच्या देखभालीतील त्रुटींमुळे एखाद्या नागरिकाचा मृत्यू झाला किंवा तो जखमी झाला तर संबंधित नागरिकांनी किंवा मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी या विशेष समितीकडे तक्रार नोंदवावी. अपघातानंतर ४८ तासांच्या आत ही तक्रार नोंदवणे बंधनकारक असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
चौकशीनंतरच मिळणार नुकसानभरपाई
तक्रार प्राप्त झाल्यानंतर समिती संबंधित कागदपत्रांची तपासणी करेल. तसेच, पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारीची चौकशी करेल. अपघाताचे कारण रस्त्यावरील खड्डे, उघडे मॅनहोल किंवा देखभालीतील त्रुटी असल्याचे निष्पन्न झाले तर, नियमानुसार ठाणे महापालिकेकडून संबंधित अपघातग्रस्त किंवा मृत नागरिकांच्या नातेवाईकांना नुकसानभरपाई दिली जाईल.
रस्त्याच्या पंचनाम्याचा आढावा
अपघाताची पडताळणी करताना संबंधित रस्त्याचा मालकी हक्क, तो रस्ता महापालिकेकडे हस्तांतरित झाला आहे की नाही, तसेच अपघातस्थळी संबंधित पोलीस ठाण्याने तयार केलेला पंचनामा (स्पॉट इन्स्पेक्शन रिपोर्ट) या सर्व बाबींचा विचार केला जाणार आहे, असेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ही समिती कार्यरत झाल्याने, रस्ते अपघातांतील नागरिकांना न्याय मिळण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.