Thane : भटक्या श्वानांचा शहरात उपद्रव; १० महिन्यांत तब्बल १२ हजार ४६५ नागरिकांना चावा, दररोज सरासरी ५० ते ६० नागरिक जखमी

ठाणे महानगरपालिका हद्दीत जानेवारी ते ऑक्टोबर २०२५ या दहा महिन्यांच्या कालावधीत तब्बल १२ हजार ४६५ नागरिकांना भटक्या श्वानांनी चावा घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Thane : भटक्या श्वानांचा शहरात उपद्रव; १० महिन्यांत तब्बल १२ हजार ४६५ नागरिकांना चावा, दररोज सरासरी ५० ते ६० नागरिक जखमी
संग्रहित छायाचित्र
Published on

ठाणे : ठाणे महानगरपालिका हद्दीत जानेवारी ते ऑक्टोबर २०२५ या दहा महिन्यांच्या कालावधीत तब्बल १२ हजार ४६५ नागरिकांना भटक्या श्वानांनी चावा घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सर्व श्वानदंश झालेल्या नागरिकांवर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात तसेच महापालिकेच्या ३३ आरोग्य केंद्रांमध्ये उपचार करण्यात आले आहेत, अशी माहिती ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. गेल्या काही महिन्यांपासून ठाणे शहरात भटक्या श्वानांचा त्रास मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना हे श्वान लक्ष्य करत आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या नोंदीनुसार, दररोज सरासरी ५० ते ६० नागरिकांना भटक्या श्वानांचा चावा घेतला जातो. तथापि, प्रत्यक्षात हा आकडा अधिक असण्याची शक्यता आहे, कारण खासगी रुग्णालये आणि डॉक्टरांकडे उपचार घेणाऱ्यांची आकडेवारी महापालिकेकडे उपलब्ध नाही.

सुमारे २६ लाख लोकसंख्या असलेल्या ठाणे शहरात अंदाजे २ ते ३ टक्के भटकी श्वानसंख्या असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे अनुमान आहे. म्हणजेच शहरात ५० ते ७० हजारांदरम्यान भटके श्वान असू शकतात. श्वानांची प्रजननक्षमता लक्षात घेता, दरमहा सुमारे २५० ते ३०० नवीन पिल्लांचा जन्म होत असल्याने त्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. महापालिकेकडून नागरिकांना रस्त्यावर भटक्या श्वानांना खाद्य देताना खबरदारी घेण्याचे, तसेच श्वानदंश झाल्यास त्वरित आरोग्य केंद्रात जाऊन उपचार घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रेबीजविरुद्ध लस उपलब्ध

ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आणि सर्व ३३ आरोग्य केंद्रांमध्ये रेबीजविरुद्धची लस नियमितपणे उपलब्ध असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. सुदैवाने, या वर्षी भटक्या श्वानदंशामुळे एकाही नागरिकाचा मृत्यू झालेला नाही, अशी माहिती आरोग्य विभागाने स्पष्ट केली.

logo
marathi.freepressjournal.in