

ठाणे : ठाणे शहरातील तापमानाचा पारा ३६-३७ अंशांवर पोहोचला असून, मध्यरात्रीही तापमान ३०-३१ अंशांच्या आसपास राहत असल्याने उष्णतेची तीव्रता कायम आहे. वाढत्या तापमानाचा फटका माणसांसोबतच शहरातील पक्ष्यांनाही बसत आहे. नैसर्गिक पाणवठे आणि मोकळ्या जागा कमी होत असताना पक्ष्यांसाठी सुरक्षित पाणवठे उपलब्ध करून देण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांसह ठाणे महापालिकेनेही यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.
तलाव, खाडी, मोठी झाडे आणि हिरव्या पट्ट्यांमुळे ठाणे शहर पक्ष्यांसाठी अनुकूल अधिवास म्हणून ओळखले जाते. मात्र, गेल्या काही वर्षांत वाढलेले काँक्रीटीकरण, वृक्षतोड आणि मोकळ्या जागांचा संकोच यामुळे पक्ष्यांचे नैसर्गिक अधिवास कमी होत आहेत. त्यातच तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने पक्ष्यांसाठी पाणी आणि सावलीचा प्रश्न गंभीर बनला आहे.
दिवसभर सूर्याच्या उष्णतेने तापलेले काँक्रीट आणि डांबरी रस्ते रात्रीही उष्णता सोडत असल्याने शहराच्या तापमानात अपेक्षित घट होत नाही. त्यामुळे पक्ष्यांना उष्णतेपासून बचाव करण्यासाठी पाणी आणि सावलीची अधिक गरज भासत आहे. मात्र, अनेक भागांत नैसर्गिक पाणवठे सहज उपलब्ध नसल्याने पक्ष्यांची गैरसोय होत आहे.
उष्णतेची धोक्याची घंटा
३६-३७ अंशांपर्यंत पोहोचलेले तापमान आणि मध्यरात्रीही कायम असलेली ३०-३१ अंशांची उष्णता ही केवळ तापमानाची नोंद नसून शहरातील जैवविविधतेसाठी इशारा आहे. माणसांकडे उष्णतेपासून बचाव करण्याचे अनेक पर्याय आहेत; मात्र पक्ष्यांसाठी पाणी, सावली आणि झाडे हाच जगण्याचा आधार आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या परिसरात पक्ष्यांसाठी पाणपात्रे ठेवण्यासोबतच महापालिकेनेही यासाठी नियोजनबद्ध उपक्रम हाती घ्यावा. शहराच्या विकासासोबत पक्षी आणि अन्य जीवसृष्टीसाठी आवश्यक नैसर्गिक अधिवास टिकविणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
पाणपात्रे ठेवण्याचे आवाहन
पक्ष्यांसाठी केवळ झाडे लावणे पुरेसे नसून, त्यांना पाणी आणि सुरक्षित अधिवास उपलब्ध करून देणेही आवश्यक आहे. सोसायट्या, उद्याने, शाळा, कार्यालये तसेच घरांच्या गॅलरीत सावलीच्या सुरक्षित ठिकाणी पाण्याची भांडी ठेवावीत, असे आवाहन पर्यावरणप्रेमींनी केले आहे. पाणपात्रातील पाणी नियमितपणे बदलणे आणि भांडी स्वच्छ ठेवणेही आवश्यक आहे. पक्ष्यांना सहज पोहोचता येईल, तसेच भक्षक प्राण्यांपासून शक्यतो सुरक्षित अशा ठिकाणी ही पाणपात्रे ठेवण्याची गरज आहे.